शिक्षण.....
ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. जसा जसा काळ बदलत गेला तसे तसे त्याचे स्वरूप आणि व्याप्ती वाढत गेली तरीही ह्या आजही माणसाच्या प्राथमिक मूलभूत गरजा आहेतच. ह्या गरजा सोबतच शिक्षण ही सुद्धा एक प्राथमिक गरज आहे. सृष्टीत असणाऱ्या प्रत्येक जीव हा जन्मतः काहीतरी शिकून येतो. काही गोष्टी त्याला शिकवाव्या लागत नाही , जसे की लहान बाळाला भूक लागली की ते रडायला लागते, हे त्याला शिकवावं लागतं नाही. काही गोष्टी ह्या आपण जन्मतः घेऊन येतो तसेच काहीसे असते. श्वास घ्यायला नाही शिकवावं लागत. जन्म झाल्यावर आपोआपच तो घ्यायला आपण शिकतोच. जगणं हे माणसाला म्हणा किंवा ह्या सृष्टीतल्या कोणत्याही सजीवाला कधीही शिकवावं लागतं नाही.
जसा काळ बदलत गेला त्याप्रमाणे शिक्षणाचे स्वरूप , माध्यम आणि त्याच्या उद्देश देखील खूप बदललेला आहे. आणि आजच्या ह्या २१ व्या शतकात तर हे अगदी प्रकर्षाने जाणवतं. पूर्वीच्या काळी म्हणजे मी म्हणेल अगदी हा असा काळ होता ज्यात शिक्षण हे एका पिढीच्या माध्यमातून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराचा माध्यमातून दिले जायचे, त्यानंतर लेखणीचा शोध लागला आणि पळसाच्या पानांवर लिहून जपून ठेवलं जायचं, पुढे कागदाचा शोध लागला आणि आजही आपण शिक्षणासाठी वापरतो आहोत आणि आज तर काय online माध्यमे आहेत , एका click वर शिक्षण उपलब्ध होतें, कुठेही जायची गरज नाही. पण आज कितीही Digital युग आलेलं असलं तरीही हातात पुस्तक घेऊन वाचण्यात, पानांतील शब्दांना स्पर्श करून ते अनुभवण्याचं जे समाधान आहे ते Kindle, tab ह्या अश्या तत्सम माध्यमांतून मिळतंच नाही.
ज्याप्रमाणे आपण जन्माला आल्यापासून ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वास घेत असतो, त्याच प्रमाणे आपला हा शिक्षणाचा हा प्रवास जन्माला आल्यापासून आपल्या शेवटा पर्यंत अगदी अविरतपणे सुरूच असतॊ. पाहिलं पाऊल, पहिला शब्द शिकण्यापासून सुरु झालेला हा प्रवास नंतर कधीच थांबत नाही. प्रत्येक वेळी शिक्षण म्हटलं की ते फक्त शालेय, महाविद्यालयीन, विशिष्ट क्षेत्रापुरतंच मर्यादित नाही, आणि मिळणारं सगळंच शिक्षण हे पुस्तकांच्या माध्यमातून मिळेलच असं नाही. अनुभवाचा माध्यमातून सुद्धा आपल्याला शिकता येतं. आपले स्वतः घेतलेल्या अनुभवांसोबतच इतरांच्या अनुभवातून सुद्धा आपण नक्कीच काही तरी शिकत असतोच. शिक्षण आणि अनुभव यांची तुलना कारणे चुकीचे आहे . खूप अनुभव आहे म्हणून शिक्षणाची गरज नाही आणि याउलट खूप शिक्षण आहे म्हणून अनुभव नसला तरीही चालतॊ असं सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही मला नाण्याच्या समान बाजू वाटतात . ज्याप्रमाणे नाण्याची एकजरी बाजू खोटी असली तर व्यवहारात त्या नाण्याला शून्य किंमत असते , तसंच शिक्षण आणि अनुभव मला वाटतो . परिस्थितीमुळे सगळ्यांनाच शिक्षण घ्यायला जमतंच असं नाही अश्यावेळी आपल्या अनुभवाच्या , कष्टाच्या जॊरावर ते त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवतात. ह्याचं सगळ्यात उत्तम आणि सगळ्यांच्या घरात असणारं उदाहरण म्हणजे आपल्या घरातली असणारी आजी . तिने नसेल कधी MBA केलं पण तिला घरातल्या स्वयंपाक घरापासून तर असणाऱ्या घरगुती आर्थिक व्यवहाराचं Management चांगलं जमतं , तिचे अंदाज आणि निकष नेहमी बरोबर जुळतं .
मी आता जे काही माझे मत मांडणार आहे, त्या मताशी सगळेच जण सहमत असतीलंच असं नाही. हे मत मांडत असतांना मला कोणाच्याही भावना दुखावणायचा प्रयत्न नाही. आज २१ व्या शतकात आपण शिक्षणाला महत्व देतोच पण ते कोणत्या माध्यमातून घेतलं जातं , कोणत्या भाषेतून घ्यावं, कुठे घेतलं जावं ह्याबद्दल अजूनही बरेच मतभेद आहेत . आज इंग्रजी ही जागतिक भाषा म्हणून ओळखली जाते म्हणून तिला महत्व देणं गरजेचं आहेच पण याचा अर्थ असा होत नाही , की इंग्रजी व्यतिरिक्त असलेली आपली मातृभाषा ही दुय्यम आहे. अवास्तव इंगजीला महत्व द्यायचं आणि आपल्या मातृभाषेचा तिरस्कार करणे, कमी लेखणे हे बरोबर नाही . आपण शिक्षण कोणत्याही भाषेतून घेतलं तरी त्याचा आपण आपल्या वास्तविक जीवनात कसा अवलंब करणार हे जास्त महत्वाचं आहे. ह्याचं एक उदाहरण द्यायचं झाले तर आपल्याला इतिहासात छत्रपती. शिवाजी महाराज, श्री रामदास स्वामी, वि.दा.सावरकर, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग व अश्या असंख्य थोर आणि महान व्यक्तींचा आपण अभ्यास केला आहे. त्यांच्या कृतीतून, विचारांतून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व घडवण्याची प्रेरणा मिळते, आज खरं तर मी हे जे काही मोकळेपणाने, स्वातंत्य पणे जे लिहू शकतोय हे खरं तर त्यांनी त्यावेळी सॊसलेल्या वेदनांमुळे आणि दिलेल्या प्राणांच्या आहुतीमुळेच खरं. नाही तर आजही आपण पारतंत्र्यात गुलामीतच राहिलॊ असतॊ. म्हणूनच जे काही आपण शिक्षण घेतोय ते कोणत्या भाषेतून आणि कोणत्या पद्धतीने घेतोय हे खूप दुय्यम आहे.
कोणते शिक्षण हे चांगले आणि कोणते वाईट हा मुद्दाच असू शकत नाही कधी घेतलेल्या शिक्षणाचा वापर कसा आणि कशासाठी केला जातो हे खूप जास्त महत्वाचं आहे. याचं एक अगदी साधं उदाहरण असे की एखाद्याने बंदूक चालवण्याचे शिक्षण घेतलं, त्यात प्राविण्य मिळवलं. जेव्हा त्याच बंदुकीचा वापर त्याच्या वास्तविक जीवनात करण्याची वेळ आली तर ???? एक तर तो निष्पाप लोकांना ठार करून अतिरेकी होईल नाही तर त्याच बंदुकीचा वापर करून तॊ पोलीस होऊन समाज कंटकाचा नाश करेल, सीमेवर जाऊन शत्रूचा सामना करेल . आज आपण हे गुन्हेगार यांचे शिक्षण बघितले तर उच्च शिक्षित असतात पण त्या शिक्षणाचा वापर ते विनाशासाठी करतात.
घेतलेल्या शिक्षणाचा वापर करून फक्त आपल्या स्वतःच्या जीवना सोबतच आपल्या समाजात, देशात आपण काय चांगले बदल घडवून आणू शकतो हा विचार मला जास्त महत्वाचा वाटतो. आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी कितीतरी वर्षांची मेहनत घेऊन संशोधन केलं, अभ्यास केला आणि आज त्यांच्या त्या मेहनतीचा आज आपण वापर करतोय. ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालंच तर Thomas Edison ह्यांनी Light चा शोध लावला. हा शोध जर लागला नसता तर कदाचित आजही आपण अंधारात असतो. त्यांच्या ह्या शोधामुळे समस्त विश्वाचं कल्याण झालं.
आज फक्त पुस्तकी शिक्षणालाच महत्व दिलं जातं त्यात व्यक्तिगत आणि सामाजिक शिक्षण यांना खूप कमी महत्व आहे हे खूप प्रकर्षाने जाणवतं. काहीवेळा आज शिक्षणाचा दर्जा हा त्या शाळेच्या / महाविदयालयाच्या वास्तूवरुन, ते देत असणाऱ्या ज्ञानार्जना पेक्षा इतर कोणत्या सुविधा पुरवल्या जातात ह्यावर ठरवलं जातं. अशाठिकाणी ज्ञानार्जन सोडून इतर सगळ्या गोष्टींना खूप प्राधान्य दिलं जातं. आज पालकांना (Parents) विचारलं की तुम्हाला तुमच्या पाल्यांनी काय व्हावं असं वाटतं, तर ९९ % पेक्षा जास्त पालकांना आपल्या मुलांनी Engineer, Pilot, श्रीमंत उद्योगपती, डॉक्टर, उच्च पदावर कार्यरत इ. व्हावं असंच वाटतं, ते वाटणं हे चुकीचं आहे असं मी मुळीच म्हणत नाही. मला त्यांना एकंच सांगणं आहे. त्यांना तुम्ही त्यांना ज्या क्षेत्रात जायचं त्यासाठी त्यांना आर्थिक, मानसिक आणि शक्य आहे त्याची मदत जरूर करा पण त्यासोबतच त्यांच्या मनावर हे देखील बिंबवा की ते ज्या कोणत्या क्षेत्रात जातील तिथे प्रामाणिकपणाने काम करा, आपल्या कृतीने, वागण्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता घ्या. Profession कोणतंही असो तिथे प्रामाणिकपणे काम करायचं. जे काही शिक्षण घेतलं आहे, घेणार आहोत त्याचा आपल्यासोबतच सगळ्यांना चांगला फायदा झाला तर सगळ्यांच्या हिताचं आहे.
आज तुमच्याकडे खूप पदव्या आहेत, तुम्ही जगातल्या सर्वोत्तम शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं आहे, तुम्ही चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहात, तुम्हाला तुमच्या ह्या पदव्यांमुळे समाजात आदर मिळतो पण तुम्हाला जर कोणाचा आदर करता येत नसेल तर, तुम्हाला कोणाशी आपुलकीने कोणाशी बोलता येत नसेल तर तुमच्या ह्या शिक्षणाचा, पदाचा काहीच उपयोग नाही. उच्च शिक्षित आहात म्हणून त्या शिक्षणाचा अहंकार नको. सगळेच उच्च शिक्षित असेच असतात मी असं अजिबात म्हणत नाही.
शिक्षण हे महत्वाचं आहे, शिक्षणाने विचार, व्यक्तिमत्व घडवण्याची चालना मिळते. खूप पदव्या मिळवल्या म्हणून शिक्षण झाले असं होत नाही, एका विशिष्ट वयापर्यंतच शिक्षण घेता येतं, शिक्षण ठराविक लोकांकडूनच घेता येतं, शिक्षण हे एखादया विशिष्ट ठिकाणीच घेता येते असं नाही. शाळेत आणि महाविद्यालयीन शिक्षण सोडलं तर शिक्षणासाठी अशी विशिष्ट जागा अपेक्षित जागा लागत नाही. शिक्षण घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची गॊष्ट गरजेची असते ती म्हणजे शिकण्याबद्दल ची तळमळता, इच्छाशक्ती, आवड असेल तर कोणालाही शिक्षण घेण्यासाठी कधीच अडचण वाटणार नाही. त्यावेळी शिकवणारा आपल्यापेक्षा वयाने लहान- मोठा आहे असे विचार मनात येणारंच नाहीत. आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला नक्कीच काहीतरी शिकता येईल. याचं एक अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर चिमणी काड्या गोळा करून तिचं घरटं छोटंसं बांधते, एकदिवस खूप वारा येतो आणि घरटं उडून जातं, तेव्हा ती त्या मोडलेल्या घरट्याकडे बघून शोक करत न बसता, त्याच काड्यांचा वापर करून पुन्हा नवीन घरटं बांधायला सुरुवात करते. तिची ही कृती आपल्या सहजच जिद्द आणि चिकाटी शिकवून जाते. आपली जर तर शिकायची जर तयारी असेल तर आपण ह्या जगात आपल्या आजू बाजूला असणारी माणसं, निसर्ग ह्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे फक्त आपली ते शिकण्याची तयारी हवी.
कोणत्याही माणसासाठी ज्ञान हा सर्वात मोठी संपत्ती आहे . ज्ञानाच्या बळावर माणूस जे अशक्य वाटतं ते शक्य करून दाखवण्याची ताकत ज्ञानात आहे . हे वेळ माणसाकडे धन नसेल तर ते विद्येच्या जोरावर सगळं शून्यातून पुन्हा निर्माण करू शकतो. ज्ञान हे शिक्षणाच्या माध्यमातूनच मिळतं. म्हणूनच खूप शिकत रहा.
विद्या ही तुमच्या वागणुकीतून सिद्ध होते.
।।।। विद्या विनयेन शोभते ।।।।।
सुनित कुलकर्णी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा