वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी
आयुष्यात असं बऱ्याच वेळा होतं काही घटना घडतात त्यांचा आपल्या मनावर तसंच आपल्या आयुष्यावरही परिणाम हॊतॊ. आपण आयुष्यात चांगल्या गॊष्टी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आनंद मिळतॊ , त्या नेहमीच व्हाव्यात असं वाटतं . वास्तवात बघायला गेलं तर आनंद म्हणजे नक्की काय आणि तॊ कसा मिळावा ह्या बद्दल प्रत्येकाचा विचार आणि मत वेगळं असू शकतं पण तरीही तॊ कोणत्याही माध्यमातून मिळत असला तरीही तॊ स्विकारण्याची आपली नेहमी तयारी असतेच. पण तेच दुःखाचा एखादा अनपेक्षित प्रसंग आलाच तर त्याला सामोरं जातांना कठीण होतं. खरं तर कोणतंही दुःख स्विकारण्याची आपली कधीच तयारी नसते. त्यावेळी हे आपल्या सोबतच का ??? आता काय करणार ?? आपलं आता कसं होणार ?? असे अनेक प्रश्न मनात येणं खूपच स्वाभावीक आहे.
अश्या परिस्थितीत समोर जो प्रसंग आहे तॊ स्विकारणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं , कारण जो पर्यंत आपण ती स्विकारणार नाही तोपर्यंत त्यातून निघण्याचा मार्गही सापडणार नाही. आलेला हा प्रसंग कदाचित आपली परीक्षा आहे असं समजून त्याला सामोरं जाणं खूप महत्वाचं असतं आणि जर प्रयत्न करायची तयारी आणि स्वतःवर जर विश्वास असले तर नक्कीच आपण त्यातून बाहेर पडू शकतोच. आयुष्यतले हे चढ उतार तर असणारच. प्रत्येक वेळी नवीन परिक्षा स्विकारण्याची आणि तिला सामोरं जाण्याची आपली तयारी हवी. आयुष्याच्या काही परीक्षा अश्या असतात ज्यात त्यांच्या येणाऱ्या निकाला पेक्षा त्या परीक्षेचा आपण कॊणत्या विचाराने सामना करून आणि आपले १०० % देणं हेच जास्त महत्वाचं असतं.
वेळ ह्या सगळ्यावर एक खूप प्रभावी औषध आहे. कारण जसा जसा वेळ जातो त्या घटनेची तीव्रता हळू हळू कमी व्हायला लागते. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच आहे , आयुष्यातल्या काही जखमा भरून निघायला वेळ लागतॊ. एखादी जखम पूर्ण भरून निघाली तरीही त्या जखमांनी दिलेल्या वेदनांची जाणीव आयुष्यभर कायम राहते. वेळेच्या ओघात आपण खूप पटकन पुढे जात असतॊ. खूप वर्षांनी ज्यावेळी आपण सहज मागे वळून बघतो त्यावेळी वाटतं अरे......... त्यावेळी आपल्याला असं कधीच वाटलं नव्हतं की कधी आपण त्यातून बाहेर पडू शकू. पण वेळेच्या ओघात आपण कधी पुढे जात राहतो कळतंच नाही . म्हणूनच वेळेचं हे औषध खरंच खूप प्रभावी आहे.
माझ्या स्वतःच्या अनुभवावरून एक सांगतो आज २८ वर्षांपूर्वी आमच्या समोर असे बरेच प्रश्न होते, पण १-१ वर्ष सरत पटकन गेलं कधी समजलंच नाही आणि आज आम्ही जेव्हा सहज मागे वळून बघतो तेव्हा सगळं कसं नुकतंच घडून गेलंय असंच वाटतं .
चांगल्या - आनंदाच्या क्षणांत खरं तर आपल्याला कोणाचीही फारशी गरज, आठवणंही नसते. पण तेच आपल्या असणाऱ्या दुःखात आपल्या जवळच्या माणसांच्या सॊबतीची , त्यांच्या आधाराची खूप गरज असते. अश्या परिस्थितीत वेळेचं औषध आपल्याला पुन्हा उभारी घेण्यासाठी खूप उपयोगी ठरतं हे मात्र नक्की .......
सुनित कुलकर्णी

Khupach chan lihile
उत्तर द्याहटवा