शुभ विवाह .............
मनुष्य हा जन्माला आल्यापासून तर मृत्यू पर्यंत त्याच्या आयुष्यात काही टप्पे येतात. जसे की बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व. जितकं माणसाचं आयुष्य त्याप्रमाणे तॊ ह्या टप्प्यातून जात असतो. आपल्या संस्कृतीत आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून आणि खूप दूरदृष्टी ठेवूनच ह्या टप्प्यात असलेल्या वयात कोण- कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचं ह्याची आपल्या शास्त्रांत खूप सूत्रबद्ध मांडणी केलेली आहे. तसं बघायला गेलं तर हे सगळेच टप्पे हे महत्वाचे आहेतच. पण त्यातला १ टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. हिंदू धर्मात मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत १६ संस्कार सांगितलेले आहेत त्यात लग्न हा सुद्धा एक महत्वाचा संस्कार आहे. शास्त्रात आपल्याकडे नवं दाम्पत्याला लक्ष्मी -नारायणाची उपमा दिली जाते . ह्यावरूनच आपल्या संस्कृतीत ह्या नात्याला किती पावित्र्य आणि महत्वं आहे .
लग्न हे एक पवित्र नातं आहे. आपल्या सामाजिक संस्थेत सुद्धा लग्न संस्काराला एक विशेष महत्व आहे. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तीच नव्हे तर दोन परिवार, दोन संस्कृतीचं एकत्र येणं आहे . माझ्यामते आजवर आपल्या भारत देशात शास्त्राप्रमाणे पिढ्यानपिढ्या जो संस्कृतीचा वारसा जपला जातोय, आपली ही सांस्कृतिक शिकवण जपली जातेय ती जपण्यात लग्न संस्काराचा खूप मोलाचा वाटा आहे . आज खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीचा लग्न हा एक मूलाधार आहे असं मला मनापासून वाटतं .आपल्याकडे पूर्वीपासूनच एक कुटुंब पद्धती आहे त्याचा वारसा आहे . आज लग्न संस्कार आहे म्हणूनच कदाचित त्यामुळेच आपली भारतीय संस्कृती आणि त्यात असणाऱ्या परंपरा आजवर जिवंत आहेत.
लग्नाच्या पद्धती या प्रत्येकाच्या धर्मा प्रमाणे, परंपरेप्रमाणे त्याच्यातल्या विधी, आचार पद्धती वेग वेगळ्या असतील पण उद्देश सर्वांचा एकच आहे तो म्हणजे दोन जीवांना एका पवित्र नात्यात जोडण्याचा . पूर्वी लग्न ठरवतांना आपल्या परिचयातील लोकांतच सोयरीक करत असे. कुटूंबातली मोठी मंडळी लग्न ठरवायची आणि वर आणि वधू हे मांडवातच पहिल्यांदा एकमेकांना बघायचे. निवड करतांना मुलगा असो किंवा मुलगी दोघांची कुटुंबे , कुटुंबातील वातावरण ह्याचा विचार प्रामुख्याने केलेला असायचा. मुलाची निवड करतांना ही आर्थिक निकष यापेक्षा त्यांच्या स्वभावावरून, कर्तृत्वावरून केली जायची आणि तेच मुलीच्या निवडीबाबत तिचा स्वभाव आणि एक भावी गृहकर्तव्य दक्ष गृहिणी ह्या मापदंडात निवड केली जायची. पूर्वी लग्न कसे एका वाड्यात व्हायचे . कुटुंब मोठं असायचं त्यामुळे कुटुंबातीलच , आजुबाजूची आणि जवळची नातेवाईक मंडळीच असायची आणि साध्या सोप्या पद्धतीने तो सोहळा पार पाडायचा, त्यावेळी कोणी किती महागडा आहेर दिलाय यापेक्षाही त्यांनी दिलेले आशिर्वाद आणि शुभेच्छा हाच अनमोल मानला जात . साध्या पद्धतीने जेवणाच्या पंगती बसायच्या ,आणि मोजकेच आणि ठराविक पदार्थ आणि त्यात एक गोड पदार्थ असं जेवण केळीच्या पानावर वाढलं जायचं . मुलगा परगावचा असेल तर येणारी वराकडील मंडळी बैल गाडी , घोड्यांवर स्वार होऊन येत असत जर फोटोग्राफर उपलब्ध असेल तर Black and white ठरविक प्रसंगाच्या क्षणचित्राचा एखादा संग्रह ( Wedding Photo Album )असायचा .
माझ्या पुढील मताशी सगळेच सहमत असतील असं नाही . काळ बदलला ,लग्नाचं स्वरूप आणि लग्न करण्यामागचा उद्देश सुद्धा बदललेला आहे. किंबहुना आपणंच ते बदलेलं आहे . त्यात मला चित्रपटांचा प्रभाव हा प्रामुख्याने जाणवतो. लग्नाचा दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक महत्वाचा दिवस असतो. विशेषतः तरुण वयात ह्याबद्दल स्वप्न रंगवलेली असतात आणि तो दिवस आपल्या कायम स्मरणात राहावा ह्या साठी प्रयत्न करतात. लग्न हा एक संस्कार न राहता एक मोठा उत्सव म्हणून साजरी केला जातोय का हे आपण बघायला हवं . आपल्याकडे म्हण आहे हौशेला मोल नाही आणि प्रत्येकाला त्याला झालेला / होत असलेला आनंद व्यक्त तो कॊणत्या माध्यमातून आणि त्यासाठी किती खर्च करायचा हे निवड स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.
आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो म्हणून तो उत्सव आहे असं सादरीकरण मला कुठेतरी ते योग्य वाटत नाही. पण फक्त एवढेच काळजी घ्यायची की निदान आपल्या आनंदामुळे इतर कोणालाही काही त्रास होणार नाही किंवा कोणा इतरांचं नुकसान तर होणार नाही इतकच. सध्याच्या विवाह सोहळ्यात फोटोशूट असतं प्री-वेडिंग फोटोशूट ,वेडिंग फोटो मग पोस्ट वेडिंग शूट असतं . फक्त महागडे कपडे , मोठ-मोठे कार्यालय ,डेस्टिनेशन वेडिंग च्या नादात राहून लग्नाचे जे काही मूळ आहे ते आपण विसरता कामा नये. आपणही बघतो लग्नात खूप प्रकारचे अन्न पदार्थ असतात त्यात आवडीनिवडीचा विचार केला जातो. लग्नातल्या उत्तम आणि रूचकर जेवणावरूनच ते लग्न कसं झालं आहे हे आजही ठरवलं जातं. लग्न समारंभात असं किती तरी अन्नाची आणि पाण्याची नासाडी होते.
ज्या पद्धतीने आज जे आपण लग्नाचं स्वरूप करून ठेवलं आहे, त्यामुळे ह्या हौस आणि मौजे सोबत आर्थिक गोष्टींचा सुद्धा विचार आपण नक्कीच करायला हवा .कदाचित ह्याच कारणामुळेच जेव्हा कधीही कोणती मुलगी जन्माला येते तेव्हा पालकांच्या सगळ्यात आधी विचार येतो की .....चला लेकीला खूप खूप मोठं करायचं , शिकवायचं आणि छान थाटामाटात लग्न लावायचं आहे ,तर ह्या सगळ्यासाठी आपण आत्ताच पासून पैशाची साठवण करायला पाहिजे . तिला चांगले घडवायचं आहे , तिला शारीरिक आणि मानासिक सक्षम बनवायचं आहे जेणेकरून ती आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असेल आणि तिच्या मनासारखा / तिला साजेसा अश्या राजकुमारासोबत अगदी थाटामाटात लग्न लावून द्यायचे. हे एक प्रत्येक म्हणजेच मुलाचे आणि मुलीचे पालकांची इच्छा असते. ही इच्छा ठेवणं , स्वप्न बघणं अजिबात चुकीचं नाहीये . पण ह्याच एका दिवसाच्या हौशे साठी प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो. लग्न करतोय हा आपल्यासाठी आनंदचा क्षण असला तरीही त्यामुळे मिरवणूक ,DJ आणि फटाक्यांचा दणदणाट न करता आपला आनंद आपल्यापुरताच साजरी करावा . बऱ्याच ठिकाणी रुग्णालये असतात, आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडे जेष्ठ मंडळी , लहान मुलं , विद्यार्थी असतात त्यांना त्या आवाजाचा खूप त्रास होतो , तो त्रास आपण नक्कीच टाळू शकतो . (त्या खर्चाच्या तपशिलात मी जात नाहीये) हा सगळा खर्च करण्यासाठी कर्ज घेतले जातं , घरातलं सोनं मोडलं जातं , कष्ट करून जे पैसे भविष्यातल्या उदर निर्वाहासाठी, भविष्यातल्या अनपेक्षित अडचणींसाठी जमवलेले असतात ते ह्या एका दिवसांत कधी खर्च होतात कळतंच नाही. सध्या खूप लोक लग्न ठरवतांना निम्मा - निम्मा खर्च वाटून घेतात ही खरं तर खूप चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे. ह्यात मला एक गोष्ट सुचवावी अशी वाटते की होणारे वर -वधू दोघेही कमावणारे असतील तर त्यांनींच जर लग्नाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलली तर कोणालाच आर्थिक ताण जाणवणार नाही आणि होणारा खर्च सुद्धा मर्यादित राहील.
आपल्या ह्या बदलत्या काळात सगळेच व्यस्त आहेत . त्यामुळे कोणाकडे जाण्यासाठी किंवा आपल्याला कडे बोलवण्यासाठी काहीतरी निमित्त हे हवं . असं सहज कोणाकडे गेलं आणि आपल्याकडे सहज आलं तरी मनात किती तरी विचार येतात.(ह्या संदर्भातलं विस्तृत लिखाण सहजच.... https://sunitkulkarni.blogspot.com/2023/03/blog-post.html ह्या लेखात केलेलं आहे) एकमेकांकडे जाणे- येण्यासाठी लग्न हे खूप चांगले निमित्त आहे. ( पत्रिकेतल्या न टाकलेल्या नावावरून असो किंवा मग दिलेल्या मानपान, आहेर यात सुद्धा नाराजीचं एखादं नाट्य नक्कीच घडतं 😉😉😉. शेवटी काय तर घरोघरी मातीच्या चुली 😅😅😅)खूप लोक म्हणतात की लग्नात अन्नदान होतं .ज्यांना खरोखरच अन्न मिळत नाही अश्या लोंकाना पोटभर जेवायला दिलं त्याला अन्नदान म्हणता येईल. लग्नात करतो त्याला अन्नदान म्हणता येणार नाही . ह्या लग्नाच्या निमित्ताने फक्त कुटूंबाच्या WhatsApp ग्रुप असणारी , आपली मित्र मंडळी एकत्र येतात. लग्न हे गेट टुगेदर सारखं असतं. आपल्याला एकमेकांकडे जायला -यायला जमत नाही तेव्हा ह्या निमित्ताने का असेना सगळ्यांच्या भेटी-गाठी होतात .
आपण माणूस आहोत आणि निसर्गतः आपल्या काही गरजा आहेत , उदा अन्न , वस्त्र , निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा त्याच प्रमाणे मानसिक आणि शारीरिक गरजा सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत . या गोष्टीं सामाजिक पद्धतीत राहाव्यात ह्यासाठी आपल्याकडे कुटुंब पद्धत आहे, कुटुंब पद्धतीचा आधारस्तंभ म्हणजे लग्न संस्कार आहे. सन्तुष्टो भार्यया भर्ता भर्त्रा भार्या तथैव च यस्मिन्नेव नित्यं कल्याणं तत्र वै ध्रुवम् ॥" ज्या कुटुंबात पती - पत्नी एकमेकांसोबत सुखी असतात . तिथे समृद्धी आणि भरभराट कायमस्वरूपी होते. माझ्या मते विवाहाला शारीरिक गरजे पेक्षा मानसिक गरज म्हणून जास्त प्राधान्य द्यायला हवं . एकमेकांची सुखः -दुःख , विचार समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण महत्व मी थोडं स्पष्ट लिहतोय लग्न म्हणजे एकमेकांवर फक्त अधिकार असणं असं होत नाही मग तो आर्थिक , मानसिक आणि शारीरिक अधिकार सुद्धा. तुम्ही लग्न करताय म्हणून तुम्हाला सगळं करण्यासाठी स्वातंत्र्य आणि सूट मिळाली असं होत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदारीच्या सहमती शिवाय त्यावर कोणताही अधिकार लादणं खूप चुकीचं आहे .
तसं बघायला गेलं तर लग्नातली हौस -मौज सगळं ठीक आहे . त्या दोघांच्याही कुटुंबाचा विस्तार झाल्यामुळे नवीन नाती जोडली जातात , त्यासोबत जबाबदारी सुद्धा येतंच असते .त्या नवं दाम्पत्यावर पुढे एका नव्या पिढीला वाढवण्याची , त्यांना घडवण्याची जबाबदारी सुद्धा आहे . त्यामुळेच लग्न करतांना ( जे उपवर आणि उपवधू आहेत त्यांनी ) ह्या गोष्टीची जाणीव नक्कीच ठेवायला हवी. ( ह्या विषयावर मी सविस्तर आणि वेगळ्या लेखात लिहणार आहे ) लग्न करण्याआधी उपवर आणि वधू ह्यांच्या शारीरिक तपासण्या याला सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं कारण, काही भविष्यात पुढच्या पिढीला होणारे आजार जसे की Thalassemia किंवा इतर होणारे आजार हे टाळण्यासाठी योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. थोडं धाडसी विधान करतोय. लग्न करणं म्हणजे दर वेळी ते फक्त वंश वृद्धी होणं ह्यासाठीच असायला पाहिजे हे गरजेचं नाहीये. मुळातंच लग्नानंतर मूल होऊ देणं -न होऊ देणं , कधी होऊ देणं आणि किती आपत्ये होऊ देणं हा त्या दाम्पत्याचा खूप खाजगी विषय आहे . काहींना फक्त एकमेकांची आयुष्यभर साथ हवी असेल , त्यासाठी सुद्धा ते लग्न करू शकतात. (ह्यात मला हे आवर्जून स्पष्ट करायचं आहे की मी कोणत्याही प्रकारे Live in Relationship ला समर्थन करत नाही आणि करणार सुद्धा नाही )
आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी योग्य जोडीदाराची निवड खूप महत्वाची असते. कारण लग्नानंतरचं आपलं जे काही उरलेल्या आयुष्याचा प्रवास त्या जोडीदाराच्या सोबतीनेच करायचा आहे . जसं मी आधीसुद्धा म्हटलं आहे . लग्न कधी, कोणाशी , कोणत्या पद्धतीने करायचं हा सर्वस्वी खूप व्यक्तीगत प्रश्न आहे . त्यामुळे त्या बद्दल मी कोणाला काहीच सुचवत नाहीये . माझं इतकंच मत आहे. जोडीदाराची निवड करतांना जितकं प्राधान्य आपण आर्थिक परिस्थिती, सौंदर्य, आणि शिक्षण ह्यांना देतो तितकंच प्राधान्य आपला जोडीदार माणूस म्हणून कसा आहे , त्याचे विचार , स्वभाव कसा आहेत हे त्याची निवड करतांना कटाक्षाने जाणून घ्यायाला हवं . कारण आर्थिक परिस्थिती आणि सौंदर्यात परिस्थितीनुसार बदल घडू शकतात. पण त्याचे विचार चांगले असतील तर परिस्थिती कोणतीही असो तो बदलत नाही. उलट तो प्रसंग कोणताही असो तेव्हा असलेल्या परिस्थितीचा धैर्याने सामना करतो. लग्न म्हणजे दोघांचा संसार जरी असला तरी त्यात दोघांच्या आई -वडिलांचा, परिवारातील जेष्ठ मंडळी त्यांच्या मताचा , विचारांचा आदर सुद्धा करायला हवा.
आपण कोणीच Perfect नसतो , प्रत्येकात काहीतरी कमी जास्त असतंच . माझ्या मते ज्यावेळी आपण लग्न करतो त्यावेळी जो ज्या ठिकाणी कमी आहे त्याठिकाणी आपला जोडीदार आपल्याला साथ देईल आणि ती कमतरता भरून काढेल. ज्याप्रमाणे हातांची बोटं सारखी नसतात पण ते जर एकत्र आलीत तर काहीही साध्य करू शकतात .लग्न म्हणजे तेच असतं. लग्न हे शुभ मानलं जातं म्हणूनच शुभ विवाह .........
धन्यवाद
सुनित कुलकर्णी
०९४२२२९२८२०
English blog link- https://sunitpkulkarni.blogspot.com/2025/10/shubh-vivaah.html

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा