देश आणि मी ......


              आयुष्यात कोणताही गोष्ट सहज मिळाली तर तिची किंमत राहत नाही मग ते रोजच्याच आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी असो किंवा मिळालेलं स्वातंत्र्य असो. त्याची किंमत राहत नाही. आज जे बाहेर वातावरण आहे त्यावरून हे नक्कीच वाटतं कि आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळालं पण आज त्याची किंमत,जाणीव मात्र आपण ठेवायला विसरतोय.

             हवी असलेली एखादी गोष्ट/ वस्तू  मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागेले नसतील तर त्या गोष्टीबद्दल जास्त जाण रहात नाही, जरी ती गॊष्ट / वस्तू  आपल्यापासून दुरावली तरीही त्याचा जास्त त्रास , कष्ट होत नाही पण तेच जर आपण खूप कष्टाने ती वस्तू/गोष्ट जेव्हा मिळवतो , तेव्हा मात्र आपण तिला जपतो, तिची जाणीव ठेवतो. ती आपल्यापासून दुरावणार नाही याची काळजी घेतॊ आणि जरी दूर गेलीच तर पुन्हा प्रयत्न , कष्ट करून ती मिळवतोच. याचं अगदीच एक साधं उदाहरण द्यायचे झालं तर एखाद्या दिवशी जेवणासाठी खूप प्रयत्न करूनही जेवणासाठी अन्नच मिळालं नाही त्यावेळी अन्नाची किंमत कळते , आणि त्यानंतर जे काही खाण्यासाठी मिळतं ते आपण आनंदाने स्विकारतो अगदी काळजीने सांभाळतो, त्याचे यॊग्य तेव्हा आणि यॊग्य त्याप्रमाणात सेवन करतो. माझ्या मते आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्यासाठी आपल्याला कॊणत्याच प्रकारचे कष्ट, त्याग, बलिदान इ. यातलं काहीही सहन करावं लागलं नाही. जे काही मिळालं ते आयतं मिळालं आहे. मुळातच पारतंत्र्य म्हणजे काय हे कधीही अनुभवलेलंच नाही. आता काहीही झालं तरी आपण पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही ही खात्री आहे. म्हणूनच आयतं मिळालेली गॊष्ट आपण कशीही वापरतो, तिचा उपभोग घेतो.

             माझ्या मते आज देश आणि स्वातंत्र्यच्या बाबतीतही आपलं काहीसं असंच झालं आहे. आज आपण जरीही स्वातंत्र्यात रहात असलो तरीही थोडं स्पष्टच बोलायचं झालंच तर स्वैराचाराच्या धुंदीत मस्त आहोत. ज्यावेळी मी या देशाचा नागरिक म्हणून विचार करतो तेव्हा आज मला माझ्या देशाबद्दल असणारं प्रेम हे काही प्रसंगांना, काही विशिष्ट्य दिवशीच व्यक्त होत असतं. जसे कि एखाद्या क्रीडास्पर्धेत असणाऱ्या सामन्याच्या वेळी त्यात जर तो सामना एखाद्या विशिष्ट देशा विरुद्ध असेल तर काही विचारायलाच नको, देशभक्तीपर , सैनिकांवर आधारित एखादा चित्रपट बघत असतांना , त्यावेळी देशप्रेम अगदी ओसंडून वाहत असतं , १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडयासोबत सेल्फी काढायला आणि I Love My India व इतर तत्सम status ठेवायला आपण विसरत नाही.

             हे विश्वची माझे  घर आहे  आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावं असं चिंतन करणाऱ्या संताच्या भूमीतले आपण आज फक्त आपल्या स्वतः पुरताच विचार करतॊ, त्यानंतर आपलं कुटुंब आपले मित्र परिवार ,मग जर वाटलंच तर आपला असलेला धर्म आणि त्या धर्मात असणारी जात आपलं विश्व् हे इतकंच  मर्यादित असतं त्यामुळे आपलं हे विश्व, हि माणसं सोडून का बरं आपण  बाकीच्यांचा का विचार करायचा हीच आपली मानसिकता आहे. आपल्या ह्या विश्वात मी , माझे, आमचं , आपलं ....... यात समावेश करत असताना देश हा सगळ्यात शेवटी असतॊ. देशाबद्दल असलेली जाणीव ही फक्त काही विशिष्ट दिवसांना आणि प्रसंगांनाच आठवते किंवा ती व्यक्त हॊते . अगदी हाच विचार जर  आपण पारतंत्र्यात असतांना तेव्हाच्या लोकांनी ज्यांना आपण आज स्वातंत्र्यसैनिक म्हणतॊ त्यांनी जर ठेवला असता तर ????  कदाचित आजही आपण पारतंत्र्यात असतॊ, आपण आज गुलामीतच राहिलॊ असतो. ह्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात अश्या बऱ्याच लॊकांनी आपल्या स्वतःचा , आपल्या परिवाराचा विचार न करता आपलं सगळं जीवन स्वातंत्र्याच्या ह्या यज्ञात समर्पित करून हा स्वातंत्र्य लढ्याचा यज्ञ सुरू ठेवला. त्यांना हे माहित असूनही कि कदाचित आपण हे मिळालेलं स्वातंत्र्य बघण्यासाठी जिवंत नसूही पण तरीही आपल्याला जे नाही मिळालं ते आपण येणाऱ्या पिढींना नक्कीच आपण मिळवूंन देऊ हे त्यांचे समर्पणच होतं ज्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनाची, सर्वस्वाची आहुती ह्या भारतमातेसाठी दिली आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगू शकतोय. याचे एक उदाहरण द्यायचं झालंच तर शहिद भगतसिंग यांचे. आज आपल्याला आपले विचार बदलण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतात. सामान्य घरातला तरुण जो देशासाठी वयाच्या २३ व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आनंदाने फाशीवर चढतो. आजच्या तरुण पिढी सोबत जर तुलना केलीच तर सगळ्याच बाबतीत ती अशक्य आहे. बरेच तरुण  नैराश्याच्या विळख्यात अडकलेले  आहेत. उत्साह खूप आहे पण तो उत्साह यॊग्य त्या ठिकाणी ,यॊग्य त्यावेळी वेळी वापरला जात नाही . सध्या तर स्वतः चे जीवनही अगदी सहज संपावतांना आपण बघतोच. आजच्या तरुणाने स्वतः जरी जबाबदारीने राहिलं तरी पुष्कळ आहे. मी सगळ्याच तरुणांच्या बाततीत हे म्हणत नाही पण बऱ्यापैकी वास्तवात हीच परिस्थिती आहे.

             आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्याबद्दल आपण आदर आणि जाणीव ठेवली पाहिजे. ती आहे ही फक्त १५ ऑगस्ट , २६ जानेवारी व इतर विशीष्ट प्रसंगांपुरतीच मर्यादित न राहता त्याच्यात आणखी काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे असं मला मनापासून वाटतं.  स्वातंत्र्य असलेल्या देशात आपण कॊणावर कोणतीच गोष्ट लादू शकत नाही हे जरी खरं असलं तरीही राष्ट्रगीत सुरू असतानां एका जागी उभं रहावं किंवा नाही, का उभं राहावं  ह्यावरून ही आज वादविवाद व्हावेत हे मात्र देशाचं दुर्दैव आहे असं मनापासून वाटतं.आपण ज्याप्रमाणे वस्तूची विभागणी करतॊ त्याच प्रमाणे आपण ह्या शूरवीर , बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांचे जात , धर्म यांच्या आधारावर विभागणी करून वादविवाद घालत बसतो. आज गणित ठरवलं जातंय की  स्वातंत्र्याच्या ह्या अग्निकुंडात कोणत्या नेत्यांनी, कॊणत्या घराण्यातल्या लोकांनी, कॊणत्या जातीच्या लोकांनी जास्त बलिदान दिलं आणि त्यावरून गलिच्छ असं राजकरण केलं जातंय हे खरंच खूप घृणास्पद आहे. मुळात आपण हे जे काही गणित आज मांडतॊय तेच खरं तर चुकीचे आहे. कारण स्वातंत्र्य लढ्यात जे कॊणी लढले त्यांना काही ठराविक जात, धर्म इ. लोकांनाच स्वातंत्र्य मिळवून द्यायचं नव्हतं तर सगळ्यांनीच ह्या अखंड भारत देश आणि या देशात असणाऱ्या एक- एक माणसाला स्वातंत्र्य मिळवूंन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. त्यांच्या आयुष्यापणाला लावलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं .

             खरंच ह्या गोष्टीसाठीच का त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं का ????? आज आपण त्यांची आठवण म्हणून त्यांची जयंती , पुण्यतिथी , त्यांची स्मारके बांधून त्यांना आदरांजली वाहतो पण तेच जर त्यांच्या आचार , विचार आणि  त्यांनी दिलेल्या शिकवणीला नेहमीच वास्तवात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर असे वादविवाद करण्याचा विचारही येणार नाही , उलट ह्या विचार आणि शिकवणी मुळे आपल्या आयुष्याला आणि विचारांना एक वेगळी दिशा मिळेल. ही  सगळी महान मंडळी आपल्या सारखीच सामान्य माणसे होती. त्यांच्या कर्तृत्व , दूर- दृष्टीकोन वृत्ती, त्यांची देश आणि मी  या संकल्पनेची व्याप्ती खुप मोठी होती आणि देशासाठी दिलेल्या यॊगदान , बलिदानामुळे ते महान झालेत.. ज्यावेळी मी ह्या अशा महान लॊकांचे विचार वाचतो ,त्यांनी दिलेल्या बलिदानाचा विचार करतॊ त्यावेळी मन उद्विग्न होतं आणि खरंच मनात स्वतःचीच थोडी लाज वाटायला लागते. त्यावेळी खरंच आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे.

             ज्यावेळी ह्या देशाचा एक सामान्य माणूस म्हणून मी विचार करतॊ , मला हा जाणीव होते कि खरंच मी आज माझ्या देशासाठी काय करू शकतो ? मुळात हे वाटलं तरीही खूप आहे. देशासाठी काही करायचं म्हणजे प्रत्येक वेळी सीमेवर जाऊन लढणं, राजकारणात राहून किंवा प्रशासनात राहून सेवा करणं ह्या पुरतंच मर्यादित नाहीये तर या पेक्षाही आपल्याला माहीत असलेल्या किंवा नसलेल्या अश्या बऱ्याच साध्या सोप्या गोष्टी आणि कृतीतून देशसेवा करू शकतॊ. ज्यासाठी खूप काही करायची , आपला खूप वेळ द्यायचीही गरज नाही.लहान असो वा मोठा , गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक जण हा आपल्या परीने देशासाठी यॊगदान नक्कीच देऊ शकतॊ. जसे की मी कायद्याने असलेल्या सगळ्या नियमांचे काटेकोर पणे पालन करेन , मी अशी कोणतीच कृती करणार नाही ज्यामुळे इतरांना काहीही त्रास होणार नाही किंबहुना याची मी दक्षता घेईल. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या मुळे ज्याप्रमाणे मला काही अधिकार मिळाले आहेत त्याच प्रमाणे माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यांची  मी जाणीव ठेवेल आणि त्याप्रमाणे पालनही करेन. प्रत्येक वेळी प्रशासन , समाजव्यवस्था  ह्यांना दोष न देता , त्यांच्यावर टीका न करता यात आपण कॊणत्या पद्धतीचे योगदान देऊ शकतॊ याकडे मी लक्ष देईल . यात एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर प्रशासनाने स्वच्छता यॊजना आणली आहे त्या प्रमाणे प्रशासनाने नेमलेली  माणसें परिसर स्वच्छ ठेवतीलही यात मी सुद्धा माझा खारीचा वाटा देऊ शकतॊ जसे कि मी कधीही आणि कुठेही असलॊ तरी कचरा  रस्त्यावर कुठेही न टाकता नेहमीच कचराकुंडीतच टाकेल. ज्याप्रमाणे मी माझं घर स्वच्छ ठेवतो त्याच प्रमाणे माझा परिसर स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि असा जर प्रत्येकाने जर ठरवलं तर आपल्या घराप्रमाणे आपला परिसर , शहर ,राज्य , देश स्वच्छ होईल. हि देखील एक प्रकारची देश सेवाच आहे.तसेच  साधी आणि सोपी गोष्ट जी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच अवलंब करू शकतो ती  म्हणजे बाहेर खरेदी बाजारात जातांना सोबत कापडी पिशवी घेऊन जाईल  जेणे करून मला प्लास्टिक पिशवी घ्यायची गरज पडणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल साधता येईल. शासन हे सर्व लोककल्याणासाठी काही योजना राबतात , त्या योजनेसाठी जर मी खरंच पात्र असेल तर मी नक्कीच त्या योजनेचा फायदा घेईल , पण तेच जर मला गरज नसेल तर मी त्या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार  नाही , जेणेकरून ज्यांना खरंच  त्या  यॊजनेची  गरज आहे त्यांना लाभ मिळेल आणि  

             कॊणत्याही गोष्टीची सुरुवात ही आधी स्वताः पासून करायची आपण आचरणात आणायची .आपण इतरांना नाही बदलू शकत त्यामुळे आपल्या या वागण्यामुळे इतर लोकंही प्रभावित हॊतील आणि त्यांना  देखील आपण प्रभावित करून आपल्या या देशसेवेच्या कार्यात सहभागी करून घेऊ शकतॊ.  ,आठवड्यातला कॊणत्याही १ दिवसाला मी स्वतःच्या वाहनाने प्रवास न करता सार्वजनिक परिवहन साधनांचा वापर करेन जेणे करून ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रण,  करण्यात माझा खारीचा वाटा मला देता येईल. जर शक्य असले  तर जवळ असणाऱ्या कामांसाठी मी गाडीचा वापर न करता पायी चालेल किंवा सायकल वापरेल यामुळे इंधनाची बचत होईल ,कोणतेही प्रदूषण होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चालण्यामुळे माझे आरोग्य निरोगी राहायला मदत होईल. पाण्याच्या ,इंधनाच्या ,अन्नाच्या ,बाबतीत केलेली बचत स्वतःच्या आणि देशहितासाठी उपयुक्त ठरू शकेल. आज आपल्या  देशाला खूप  मोठ्या प्रमाणात खनिज तेल आयात करावं लागतं ,त्यासाठी आपल्या अर्थ व्यवस्थेवर ताणही पडतो आपल्या ह्या रोजच्या सवयी बदलामुळे तॊ ताण काही अंशी का असो ना पण नक्कीच कमी होईल. आपल्या देशात रहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत ज्यात मतदान करणं हा एक प्रमुख मूलभूत अधिकार आहे त्याच प्रमाणे संविधानाप्रमाणे असणाऱ्या कायद्याचे पालन करणे ,   नियमित कर भरणे ,सगळ्याप्रकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन  करणे. आज मला देशात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर मी विरोध करतांना कॊणत्याही प्रकारच्या हिंसेच्या मार्गाचे अवलंबन करणार नाही तसेच जर माझ्या देशाबद्दल कोणी चुकीची माहिती ,  किंवा अपप्रचार करत असेल तर अश्या घटकांना मी विरोध करेल , मी अशी कोणतीही कृती करणार नाही ज्यामुळे सामान्य माणूस , सामाजिक मालमत्ता यांचे आर्थिक नुकसान होईल , त्यांना माझ्या कृतीमुळे कॊणत्याही प्रकारची असुविधा हॊणार नाही याची मी कटाक्षाने काळजी घेईल.

             आपला एक छोटा प्रयत्न ,लहानशी कृती एका चांगल्या गॊष्टीची सुरुवात होऊन ती इतरांना सुद्धा ती कृती करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. स्वातंत्र्याच्या लढाईसाठी ज्याप्रमाणे १-१  करत लॊक सहभागी झालेत . त्याच प्रमाणे आपल्या देशाला स्वच्छ आणि सम्रुद्ध बनवण्यासाठी देशातील प्रत्येकाचा सहभाग  आणि यॊगदान खुप मोलाचं ठरणार आहे. फरक तॊ इतकाच की स्वातंत्र्य मिळवण्याच्या लढाईत  लॊकांना आपल्या प्राणाची , सर्वस्वाची आहुती द्यावी लागली होती , बलिदान द्यावं लागलं होंतं आणि आजच्या ह्या लढाईत आपल्याला आपल्या काही सवयी आणि  थोडा विचार बदलायचा आहे इतकंच. आपण कॊणत्याही क्षेत्रात काम करता असलो तरीही आपण आपल्या परीने देशासाठी कशा प्रकारे यॊगदान  देऊ शकतो याचा विचार करून त्याप्रमाणे कृती केली तर निश्चितच आपण आपल्या देशाला पुढे नेऊ शकू आणि येणाऱ्या पिढीसाठी हा आदर्श ठेवून आपलं हे समृद्ध भारत देशाचे कार्य पिढीनं पिढी असंच कायम सुरु राहील असं मला मनापासून वाटतं.
                                                                                                       
                                                                                                     धन्यवाद 
                                                                                                     सुनित कुलकर्णी
                                                                                                     ९ ४ २ २ २ ९ २ ८ २ ० 











टिप्पण्या

  1. खरय,प्रत्येकाने हा विचार करणे गरजेचे आहे,नव्हे ते आपले कर्तव्य आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ,
      मला वाटतं कर्तव्यापेक्षाही ही आपली जबाबदारी आहे. कारण कर्तव्य करण्यासाठी ती गोष्ट लादली , किंवा परिस्थिती मुळे ती स्वीकारावी लागू शकते. पण तेच जबाबदारी म्हटल्यावर आपण स्वःताहुन पुढाकार घेऊन ती गोष्ट पूर्णत्वात आणण्यासाठी प्रयत्न करतॊ.  .  

      हटवा
  2. सुंदर लिहिले आहे.विचार करावयास लावणारे.प्रत्येक नागरिकाने कटाक्षाने काही गोष्टी पाळल्या तर खूप साध्य झाले असं म्हणता येईल.

    उत्तर द्याहटवा
  3. खरंय आज सुरवातच स्वतःपासून करायला हवा,जय हिंद🇮🇳

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............