प्रेम.............


                    'प्रेम' या शब्दातच खरं तर खूप सारा अर्थ लपलेला आहे. आजपर्यंत प्रेमाबद्दल खूप जणांनी सांगितले आहे, बरंच  काही लिहलेलं आहे. नक्की प्रेम म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मते प्रेम दुसऱ्यांबद्दल  वाटणारी आदर आणि आपुलकीची भावना. ज्यात आदर आणि आपुलकी सॊबतच विश्वासही आहे. आपल्याला ह्या भावना ज्या कोणाबद्दल वाटतात त्यांच्यावर आपण प्रेम करतॊ असं म्हणायला काहीही हरकत नाही. माझ्या मते प्रेम आणि नातं ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. ते असं कि , " आयुष्यात नेहमी प्रेम करून असलेली नाती आणखी घट्ट करावीत आणि प्रेम करून आणखी नवीन नाती जोडत जावी ".

                    आज  मला असं वाटतं  की  आजच्या आपल्या प्रेमाबद्दलच्या असणाऱ्या विचारांवर चित्रपटांचा खूप प्रभाव आहे. त्यामुळेच आपलं प्रेम असण्याची ,ते व्यक्त करण्यात असणारा सहजपणा ,साधेपणा आपण विसरलोय. आजही काही लॊकांच्या मते  प्रेम म्हणजे एखादा मुलगा आणि मुलगी नेहमी सोबत एकत्र  असतात तर त्यांचे  प्रेम (काही तरी लफडं) नक्कीच आहे अशी शंका असते. खरं  तर असा विचार करणाऱ्यांना प्रेमाचा अर्थच कळालेला नसतो.आज शाळा - कॉलेज मध्ये असं  असतं  की  खूप कमी वयातच  मुलं -मुलीं  प्रेमात पडतात. वास्तवात प्रेमात पडायला वयाचे बंधन नाही पण तरीही ह्या तरुण वयात ते स्वाभाविकही असतं . या वयात प्रेमाबद्दलच्या संकल्पना अतिशय वेगळ्याच असतात. त्या वयात मुळातच एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं , देखणेपणा वर प्रभावित होणं  ह्या भावनेलाच प्रेम समजलं जातं. प्रेम ह्या भावनेला काही विशिष्ट रंग ,आकार आणि एखाद्या दिवसापुरतंच  मर्यादित करून टाकलं आहे . खरं तर प्रेम ही  अतिशय शुद्ध , पवित्र आणि प्रामाणिक अशी भावना आहे  जी  कोणत्या विशिष्ट रंगात , आकारात  आणि दिवसाच्या ताळेबद्ध साच्या पुरतंच व  कोणत्याही  एका व्यक्ति पुरतेच मर्यादित ठेवणं शक्यच नाही आणि योग्यही नाही . 

                    प्रेमात सौंदर्य , आकर्षण व इतर  बाह्य गोष्टींना कधीच महत्व नसतं . आजच्या  तरुण मंडळींच्या प्रेम असण्याच्या किंबहुना ते व्यक्त करण्यात चित्रपटांचा खूप प्रभाव आहे. ते असं की  तरुण मंडळी स्वतःला चित्रपटातल्या  नायक प्रमाणे आपल्या प्रियसी समोर आपले प्रेम व्यक्त करतात. तसेच आज साजरी होणारे काही विशिष्ट  दिवस साजरी करणं यात चित्रपटांचा प्रभाव आहे. प्रेमातला सहज पणा कुठेतरी विसरलोय. प्रेम हे होण्यासाठी आणि ते कळण्यासाठी असं विशेष काहीच करावं लागत नाही. प्रेम हे असं कोणावर ठरवून करता येत नाही ,  ते आपोआप आणि अगदी सहज होतं . प्रेमात एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना आधार देणं, एकमेकांच्या भावना आणि विचार यांचा आदर करणं आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी काही ठराविक गोष्टी, ठरविक रंग , आणि विशिष्ट दिवसच पाहिजे असं नाही. जे न बोलताही कळतं , जे शब्दांतही  व्यक्त न करता जाणवतं  तेच प्रेम आहे. जे अगदी सहज आणि कधीही व्यक्त करता येतं ते प्रेम आहे

                    आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम असलो तरी हे जरुरी नाहीये की  त्या व्यक्तीचं  सुद्धा आपल्यावर प्रेम असेलच असं नाही. त्यामुळेच प्रेम करण्यासाठी की, होण्यासाठी कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही. कारण जबरदस्ती करून प्रेम कधी कोणावर लादता येत नाही आणि जे लादलं ते प्रेम नाहीच मुळी . प्रेमात नेहमीच एकमेकांच्या भावनांचा आदर करणं खूप महत्वाचं आहे.

                    आपल्या संतांनी सुद्धा प्रेमाबद्दल सांगितलेलं आहे . जसं की , संत श्री ज्ञानेश्वर महाराज असं लिहतात 
प्रेम हे केवळ सांसारिक प्रेम नव्हे, तर ते ईश्वरप्रेम, भक्तिप्रेम आणि विश्वात्मक प्रेम होते. त्यांच्या विचारांमध्ये प्रेम हेच परम तत्व आहे आणि तेच आत्मज्ञानाकडे नेणारे साधन आहे.  "जगी प्रेम हेच श्रेष्ठ आहे।" (जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजे प्रेम.) समर्थ रामदास स्वामी असं लिहतात की  ईश्वरप्रेम, राष्ट्रप्रेम, गुरुशिष्य प्रेम आणि समाजप्रेम याभोवती नेहमी केंद्रित असावं . त्यांनी प्रेमाला कर्तव्य, शिस्त आणि सेवा यांच्याशी जोडले. सगळ्याच धार्मिक ग्रंथ प्रेमाला अत्यंत उच्च स्थानदिलेलं आहे .वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, भागवत पुराण आणि अन्य ग्रंथ हे प्रेमाला अत्यंत उच्च स्थान देतात. प्रेम हे केवळ मानवी भावना नसून, ईश्वरप्राप्तीचे साधन, भक्तीचे मूळ आणि विश्वकल्याणाचा मार्ग आहे. भगवद्गीते प्रमाणे  हे प्रेम फक्त सांसारिक न राहता, ते भक्ती, कर्म, ज्ञान आणि सर्वसजीवांप्रती दयाळूपणात व्यक्त  होते.  थोडक्यात धार्मिक ग्रंथ उपनिषदे आणि वेदांमध्ये सर्व सृष्टीवरील प्रेमाला  हा ईश्वरप्रेमाचा मार्ग मानला आहे.

                    जीवनात आपल्यावर ज्यांनी कोणी आजवर आपल्यावर प्रेम केलं , त्यांना आयुष्यात कधीही विसरू नका , प्रेम हे खूप अनमोल आहे आणि ते नेहमीच इतरांना देत जावं . जे दिल्यानंतर आणखी मिळतं  ते प्रेमच आहे. प्रेम खरं  परमेश्वराने माणसाला दिलेली एक अशी शक्ती आहे की  जी आपल्याला आयुष्य जगण्यासाठी, आयुष्यात आनंद मिळण्यासाठी नेहमीच प्रेरीत करते. तुम्ही इतर कोणावर प्रेम करा किंवा नका करू पण आपल्या ह्या परमेश्वराने दिलेल्या देहावर ,ह्या जन्मावर अगदी मनापासून प्रेम करा . " या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे...... " हे  श्रेष्ठ कवी श्री. मंगेश पाडगावकरांची म्हंटलंय ते अगदी खरं आहे.

                    प्रेम हे फक्त  माणसापुरतंच मर्यादित न ठेवता आपलं  कुटुंब, मित्र परिवार ,आपण जे काम करतो छोटं असो वा मोठं , आपल्या देशावर , ह्या सृष्टीत असणाऱ्या सगळ्या घटकांवर  आणि हो स्वतःवर सुद्धा अगदी मनापासून प्रेम करा...... 

                                                                                                              सुनित कुलकर्णी
                                                                                                                ९४२२२९२८२०

(updated Feb 2025)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............