दृष्टीकोन आयुष्याकडे नव्याने बघण्याचा ..................
आयुष्यातही सगळयांना आपल्या हवं तसं घडावं सगळ्यांना वाटतं पण काही वेळा असं काही घडतं की ज्याची आपण कधी साधी कल्पना सुद्धा केलेली नसते. ह्या गोष्टीचं अगदी ज्वलंत उदाहरण द्यायचं झालेच तर आज समस्त जग जे अनुभवतोय Covid -१९ ची परिस्थिती . डिसेंबर २०१९ ला चीन मधील वुहान प्रांतात सुरवात झालेल्या एका संसर्गजन्य रॊगा मूळे बघता बघता सगळं जग थांबलं . हजारो किलोमीटर दूर झालेला आजार माझ्या घरात कधी पोहोचला मला समजलंच नाही. आपलं शहर, राज्य आणि देश बंद हे आपण आजवर अनुभवले आहेत पण ते क्वचितच २ दिवसांपेक्षा जास्त कधी राहिलेलं मला आठवत नाही पण आज ह्या सगळं जग कधी एकाच वेळी बंद असले ह्याची कधीच कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती. तसं बघायला गेलं तर गेल्या २ वर्षांत ह्या जगात असण्याऱ्या प्रत्येक माणसावर काहीतरी परिणाम नक्कीच झाला. गरीब असो व श्रीमंत , कोणत्याही धर्माचा , जातीचा असॊ ह्या सगळ्यांवर कमी-जास्त प्रमाणात नक्कीच प्रभाव पडलाय.कारण हा आजार होताना कोणताही धर्म , जात, प्रदेश आणि देश बघत नाही. तो कोणालाही होऊ शकतो. जो तॊ आपल्या परिने संघर्ष करून ह्या परिस्थितून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करतोय आणि स्वतःची व जवळच्या माणसांची सर्वज्ञात नियम पळून काळजी घेतोय.
आज बाहेर जाणं हे खूप धोक्याचं आहे म्हणून आपण आपल्या घरातल्या माणसांसोबत वेळ घालवतोय. २१ व्या शतकात राहतो त्यामुळे सगळ्या जगाची माहिती आपल्याला एका Click वर उपलब्ध आहे. आज तसं बघायला गेलं तर ह्या मिळणाऱ्या माहितीमुळे कुठे तरी मनात नकारात्मक विचार निर्माण होतात आणि जरी शारीरिक दृष्ट्या सक्षम असलो तरीही मनाने अगदी खचलेली असंख्य माणसं आहेत. ह्या आजारात सगळयात दुर्दैवी गोष्ट अशी की आपली कितीही इच्छा असली तरीही आपण कोणाच्या मदतीला जाऊ शकत नाही. आपण सगळेच जण आतुरतेने वाट बघताय की कधी ह्यातून बाहेर पडू असं झालंय . १ ली लाट, २री लाट, ३री लाट ...... सगळंच कसं खुप भयंकर आहे.
आज आपण जे घरात राहून आपल्या माणसांसोबत वेळ घालवतोय किंबहुना तशी कधी संधीच आपल्याला मिळाली नसती. कमी गोष्टींत आणि जे आहे त्यातुन मिळणारा आनंद आपल्याला अनुभवायला मिळाला. आपण इतरांचं नेहमीच ऐकत असतो, बोलतो पण स्वतःशी कधी बोललोय का कधी आपण? इतरांसाठी वेळ काढतो पण स्वतःसाठी कधी वेळ काढला ? आयुष्याकडे एका वेगळ्या दुष्टीकोनातून बघण्याची संधी मिळाली असं समजायचं. कारण कितीही ठरवलं असतं तरीही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्या १.५ वर्षांपूर्वी अशक्यच वाटत होत्या. आज बाहेरची परिस्थितीच अशी आहे कि आपल्याला काही नियमांचे कठोरपणे पालन करायचं आहे. कारण आपल्या आणि आपल्या माणसांच्या जीवना पेक्षा ह्या जगात दुसरी कोणतीच गोष्ट नाही हे आपल्याला अनुभवायला मिळालं. काही गोष्टी आयुष्यात प्रयत्न करून परत मिळवता येतात , वेळ लागला तरीही. पण तेच आपल्याला कायमचं सोडून गेलेचा माणूस परत कधीच मिळवता येत नाही याची आपल्याला जाणीव झाली. ह्या परिस्थितीत असं झालंय की इच्छा असूनही आपण कोणाला मदत करू शकलेलो नाही. खरं तर हे आपण जेव्हा आपलं दैनंदिन आयुष्याला सुरुवात करू त्यावेळी थोडंसं अवघड होणार आहे. ह्या काळात जीव गेलेल्या माणसांत आपल्या जवळ असणाऱ्या माणसांची झालेली रिकामी जागा सतत आपल्याला त्यांची आठवण कायम खुणावत राहणार आहे.
आज माणसाने संशोधन करून कितीही शोध लावून कितीतरी गोष्टींवर नियंत्रण मिळवलेलं असलं तरी सुद्धा काही गोष्टी ह्या आजही माणसाच्या हातात नाहीत हेही तितकंच महत्वाचं आहे. इतर गोष्टी आपल्या कधीच हातात नसतात , त्यासाठी तो वेळ जाऊ देणं आणि त्याकाळात आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं हेच आपल्या नियंत्रणात असतं . कोणतीही गोष्ट घडली तर त्यातून चांगला आणि वाईट बोध आपण कसा घेतोय हे खूप महत्वाचं आहे. जरी सध्याची परिस्थिती अनुकूल नसली तरीही त्यात खचून न जाता धैर्याने सामना आपल्याला करायचा आहे. अश्या कॊणत्याही प्रसंगातून ह्या सृष्टीला तिचा समतोल साधण्यासोबत आपल्याला ( माणसाला) आयुष्याकडे वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याची संधीच दिली आहे असं समजायचं . आहे तो दिवस आपल्याला बघायला मिळाला ह्यात आनंद मानायचा. आपण स्वतःही खचायचं नाही आणि इतरांना सुद्धा खचु द्यायचं नाही.........
बाहेरची परिस्थिती बदलण्यासाठी सगळेच जण त्यांच्या परीने जे जे शक्य असेल ते प्रयत्न करत आहेत पण आपल्याला आपल्या स्वतःची शारीरिक आणि मानसिक स्थिती बळकट ठेवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. ह्या परिस्थितीत सकारात्मक बदल आपण स्वतः मध्ये नक्कीच घडवू शकतो आणि आता जे काही उरलेलं आयुष्य आहे त्याकडे एका वेगळ्या आणि नव्या दृष्टीकोनातून बघण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.........

मस्त लिहिले आहेस
उत्तर द्याहटवा