आई ..........

                                                             



                     आई..... प्रत्येकाच्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग असतो . खरं  तर आई आहे म्हणूनच हे  आयुष्य आहे.  मी परमेश्वर मानतो आणि मी हे कुठे तरी वाचलंय  की  परमेश्वराला सगळयांची  एकाच वेळी काळजी घेणं शक्य नाही म्हणून त्याने ह्या पृथ्वीवर सगळ्यांना आई दिली जी  सगळ्यांची  काळजी घेते, सगळ्यांना प्रेम देते .माणसापासून तर प्राण्यापर्यंत सगळ्यासाठी हा निर्सगाचा  नियम आहे.  आपल्या शास्त्रात सुद्धा आईला खूप महत्व दिलेले आहे . कुठे मातृदेव भव आईला देव किंबहुना देवा पेक्षाही श्रेष्ठ मानलं आहे  तर आईचं  महत्व सांगण्यासाठी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे सुद्धा सांगितले आहे.

                    वास्तवात आई आणि बाबा ह्यात श्रेष्ठ कोण हा भेद करणं खूप चुकीचं आहे आणि मुळात त्यांच्या प्रेमाची कधी तुलना होऊ शकतच  नाही . लहानपणापासून आपला कळत -नकळत ओढा हा नेहमी आई कडे जास्त असतोच  हे बाबाला सुद्धा मान्य  असतं  कारण त्याला सुद्धा आई असतेच  त्यामुळे त्याला ह्या गोष्टीच कधीच वाईट वाटत  नाही. मनोविज्ञानातील काही संशोधकांनी हे सिद्ध केलं  आहे की  जन्मतः  मुलाचा ओढा हा आई कडे जास्त असतो तर मुलींचा  ओढा हा बाबांकडे  जास्त असतो. मुलगा आणि मुलगी हे दोघेही त्यांच्या  आई - बाबांसाठी सारखेच असतात आणि ते त्यांच्यावर नेहमी समान प्रेम करतात . आपल्याला जगण्यासाठी ज्याप्रमाणे पाणी आणि ऑक्सिजन  जितके महत्वाचे तितकंच महत्व आई -बाबा यांचं  आपल्या आयुष्यात आहे . 

               कुंभार ज्या प्रमाणे मातीचा गोळा त्या चाकावर ठेवतो, त्याला खूप थोपटतो, आणि नंतर त्याला हळू -हळू मायेचा  स्पर्श करून त्याला एक आकार देतो आणि सुंदर कलाकृतीची निंर्मिती करतो . आपल्या  आयुष्याच्या बाबतीत  अगदी तसंच  काहीसं  आहे . ज्याप्रमाणे सुरवातीला कुंभार त्या गोळ्याला स्थिरावण्यासाठी थोपटतो  त्याच प्रमाणे कोणताही आकार नसलेल्याला आपल्याला बाबा थोपटून स्थिरावतात आणि नंतर आई प्रमाणे मायेचा स्पर्श देऊन त्या गोळ्याला चांगलं  घडवते . म्हणूनच आपल्याला घडवण्यात आई  आणि बाबा दोघांचंही योगदान तितकंच महत्वाचं आहे . 

                 एकदाचं  मूल  जन्माला आलं  की ते कसंही असलं  तरीही आई त्याच्यावर प्रेम करते , तिचं सर्वस्व विसरून ती  त्याच्या सांभाळ करते , त्याला सक्षम बनवते. आपण चुकलो तर पाठीत धपाटा सुद्धा घालते .  हे फक्त माणसाच्याच बाबतीत लागू होत नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा आई तिच्या पिल्लांची काळजी  घेते , त्यांचे पालन पोषण करते , त्यांना सक्षम बनवते . एक उदाहरण द्यायचं झालं तर मांजर तिच्या पिल्लाला मोठं करते, त्याला शिकार करायला शिकते.आई ही  ती  त्या बाळात इतकी रमते जणू तीच्या साठी ते बाळच तिचं  विश्व होऊन बसते . त्या बाळाच्या आनंदासाठी ती सगळं  काही करते , वेळ प्रसंगी ती त्या बाळाच्या संरक्षणासाठी रौद्र रूप सुद्धा धारण करते .जेव्हा कळतं तिच्या पोटात  जीव वाढतोय त्या क्षणापासून तर तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती तिच्या मुलांसाठी काळजी घेत  असते  लहान मुलाचं सुद्धा काहीसं  अगदी असंच  असतं. ते ज्यावेळी रडतं  त्यावेळी जगातली कितीही महागडी खेळणी आणून दिली तरीही आई शिवाय ते राहत नाहीच . 

               आता मी जे मत मांडणार आहे ते थोडं कठोर पण आजचं  वास्तव आहे . जो पर्यंत आपल्याला कळत नाही तोवर जी आपली आवड - निवड असते तीच आईची असते . तिला आपल्या सगळ्या आवडी -निवडी माहिती असतात पण आपल्याला कळायला लागल्यावर तिच्या आवडी -निवडी कधी जाणून घेण्याचा विचार केला कधी ?????? खरं  तर कळत -नकळत का असो पण आईला आपण बऱ्यापैकी गोष्टींत गृहीत धरतो. तिच्या मताचा, तिच्या विचारांचा कोणताही आदर न  ठेवता तिच्यावर गोष्टी लादत असतो हे आपल्याला कधी कळतंच  नाही.  एक खूप सामान्य उदाहरण देतो ते किमान एकदा तरी आपल्या घरी नक्कीच घडून गेलं  असेल . कधी एखाद्यावेळी साधं भाजीत थोडं  मीठ कमी असेल तर आपण ती भाजी तशीच टाकतो. अश्या असंख्य प्रसंगांना आपण आईचा कोणताही विचार न करता  नेहमीच व्यक्त होत असतो. आई तिची स्वप्न सोडून आपल्याला स्वप्न दाखवते आणि ते स्वप्न आपण पूर्ण करावी म्हणून ती नेहमी खंबीरपणे आपल्या पाठीशी नेहमी उभी असते. पण कधी तिच्या स्वप्नाबद्दल कधी विचारलं ? मी असंही  बघितलंय  काही  ४ बुकं काय शिकले कि स्वतःला काय समजायला लागतात देव जाणे त्यांना त्यांच्या आईच्या शिक्षणाची, तिच्या रूपाची लाज वाटायला लागते  आणि कोणी येणार असेल तर स्पष्ट सांगतात की  आई तू plz बाहेर येऊ नको. हे स्पष्ट सांगणारे सुद्धा काही जण आहेत.  त्यांना त्यांच्या आई- वडिलांची लाज वाटते. लग्नाच्या स्थळांच्या बाबतीत मी सुद्धा हे अनुभवलंय की  काही विशिष्ट मानसिकता असणाऱ्या मुलींना लग्न झाल्यानंतर मुलाचे आई-वडील सोबत नको अशी अट  घालतात, लग्नानंतर मुलाच्या आई- वडिलांसोबत न राहता स्वतंत्र्य  राहावं  अशी त्यांची तशी इच्छा असते.  

                    प्रत्येकासाठी त्याची आई ही  special  असतेच. ती जवळ असतांना  तिची कदर नसते पण तिच्यापासून दूर गेल्यावर तिची किंमत कळते . आजच्या २१ व्य शतकात आई च्या कष्टाबद्दल जाणीव होते ती फक्त ८ मार्च (जागतिक महिला दिन) आणि ८ मे ( Mother's Day )ह्या दिवसांना आपल्याला ती ची आणि तिने आजवर आपल्यासाठी केलेल्या कष्टांची जाणीव होते ( ह्या बद्दल मी थोडा संदर्भ ह्या (ती--- https://sunitkulkarni.blogspot.com/2022/03/blog-post.html ) ह्या लेखात या आधीच दिलेला आहे. . असं म्हणतात की  आई तिच्या मुलांचे सगळे गुन्हे माफ करते , तिची मुलं  तिच्यासोबत कशीही वागली तरी तिचं  त्यांच्यावर असणारं प्रेम काडीमात्र कधीच कमी होत नाही. 

                    जन्म दिला म्हणून तीच फक्त आई असते असं नाही . जी आपला सांभाळ करते तिला सुद्धा आपण आई म्हणतो.  कृष्ण भगवान यांना देवकी मातेने जन्म दिलासा असला तरीही यशोदा नंदन म्हणून कृष्णाला ओळखलं जाते. आपल्या ह्या अखंड भारत देशाला आपण भारत माता म्हणतोच , गाईला सुद्धा आपण गोमाताच म्हणतो , आपली ही  जी जमीन आहे ती आपलं पालन-पोषण करते ती धरणीमाता आणि आपल्या समस्त जगाचं  ओझं जी वाहते आहे ती पृथ्वीमाता आहेच . म्हणूनच जन्मदाती  हीच फक्त आई असं म्हणता येणार नाही.   

                    आज क्षणभर आईचा विचार मनात आला तर तिने आपल्यासाठी आजवर जे जे केलंय  ते सगळं आठवतं . त्या आठवणीने ओठावर हसू आणि डोळ्यात थोडं पाणी आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकासाठी त्याची आई हा त्याच्या जिव्हाळ्याच्या विषय असतो. रोज आपण सगळ्यांसाठी  वेळ काढतो तर थोडावेळ आई साठी देऊ आजवर तिने आपलं  सगळं  ऐकलंय आता आपली वेळ आहे तिचं  सगळं ऐकून  घेण्याची.  तिने जसं  नेहमीच आपल्याला स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलंय तशी आता आपली वेळ तिला आपल्यामुळे तिच्या राहिलेल्या स्वप्नानां पूर्ण करण्यासाठी तिला  प्रोत्साहन देण्याची. प्रसंगी आपण तिची आई होऊन तिला  प्रेम देण्याची. तिला आदर आणि तिला समजून घेण्याची. 

शेवटी आई बद्दल लिहायचं ठरवलं तर ते कितीही लिहलं तरी ते कमीच आहे. आई हा प्रेमाचा अथांग प्रवाह आहे जो कधीही आटणारा नाही , म्हणूनच तिची कदर करायला हवी............

                                                                                                                               सुनित  कुलकर्णी 

 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............