पत्रास कारण की ..............
परवा सहजच बाहेर निघालो तेव्हा खाकी वेशात , टोपी घातलेला , एक विशिष्ट बॅग खांदयावर घेऊन जातांना एक व्यक्ती दिसला आणि ती व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून पॊस्टमन काका आहेत हे लक्षात आलं . आजच्या २१ व्या शतकात ' पत्र ' बऱ्याच लॊकांना outdated वाटतं . Email , WhatsApp , Telegram , SMS व अजून इतर यांच्या काळात ' पत्र ' कुठे आणि कधी हरवलं हे लक्षातच आलं नाही कधी . आजच्या नव्या पिढीसाठी 'पत्र ' ही संकल्पना राहिलेलीच नाही , आणि संदेश वहनासाठी पत्र आणायला, ते लिहायला , ज्याला पाठवायचं आहे त्याचा पत्ता शोधून , ते Post Office / Post Box पर्यंत जाऊन ते त्यात टाकायला , परत त्या टाकलेलं पत्र मिळाल्यानंतर त्याचा प्रतिसाद मिळेल तो पर्यंत थांबायला कोणाला वेळ आहे ????? आज का जमाना सब Instant का है . मला वाटलं मी लगेच phone केला, Video Call केला , जे सांगायचं होतं , जे बॊलायचं ते पटकन करून विषय संपवला . सगळंच कसं Instant झालं . आज लहान मुलांना पत्र , पोस्टमन आणि Letter Box हे फक्त त्यांच्या पुस्तकातल्या धड्या पुरतेच माहित असेल .
पत्र याबद्दल जर कधी आपल्या आई - बाबांना , आपल्या आजी - आजोबांना विचारलं तर ते त्यांच्या आठवणींत रमून जातात . पत्र हे त्यांच्यासाठी काय असायचं हे सांगतांना त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत . पत्र आणि त्यांचं एक वेगळंच नातं असायचं .माणसाला बोलतांना व्यक्ती, वेळ आणि शब्दांचं सुद्धा काहीवेळ बंधन पाळावं लागतं , पण तेच शब्द जेव्हा तो कागदावर व्यक्त करतो तेव्हा त्याला कोणतंही असं बंधन नसतं . पत्र हे कोणत्या प्रसंगासाठी, कोणत्या प्रकारच्या हस्ताक्षरात , किती पानांत, कोणत्या पेनाने लिहलेलं आहे ह्या सगळ्यांच्या पलीकडे त्यात असणाऱ्या शब्दांना , व्यक्त केलेल्या भावनांना महत्व असायचं . काही वेळा तर ते पत्र लिहतांना लिहीणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातून पडलेल्या त्या अश्रूंमुळे एखादा शब्द पुसत झालेला असायचा . तेव्हा त्या पुसट झालेल्या शब्दातून न लिहिता सुद्धा वाचणाऱ्याला त्या पत्र लिहणाऱ्याच्या भावना , त्याची मनःस्थिती सहज कळायची . इंग्रजीत एक म्हण आहे Read between the lines..... अगदी तसंच .
ज्याच्यासाठी / ज्यांच्या साठी ते पत्र लिहतोय त्यांचा विचार करून , त्यांच्या बद्दलच्या असणाऱ्या आठवणींत रममाण होऊन एक - एक शब्द करत जे मनात आहे ते मनमोकळेपणाने व्यक्त करून ते पत्र लिहायचं , पोस्ट करायचं आणि ज्याला पाठवलं आहे त्याला ते कधी मिळेल ह्या आशेवर राहणं , ते पत्र मिळाल्यानंतर भलेही ती व्यक्ती / त्या व्यक्ती समोर नसतील पण ते पत्र आणि त्यातला एक- एक शब्द वाचतांना , त्यांच्या चेहऱ्यवरचं हसू , डोळ्यातलं आसू याची कल्पना करून त्याने आपल्या पत्रासाठी लिहीलेल्या उत्तराची तितक्याच आतुरतेने वाट बघत राहायचं . कधी तो खाकी गणवेशातला पॊस्टमन दादा त्याच्या भरलेल्या गाठोडीतुन आपल्या नावाचं पत्र आपल्या हातात देतोय आणि माझ्या पाठवलेल्या पत्राला समोरून काय उत्तर मिळालं ते वाचण्याची उत्सुकता ही खरी वास्तवात अनुभवण्याची मजाच काही वेगळी असायची . आलेली पत्रं जीवापाड जपून ठेवायची आणि जोवर पाठवलेल्या पत्राचं उत्तर येत नाही तोवर कित्ती तरी वेळा तीच- तीच पत्रं पुन्हा वाचताना कधी कंटाळाच येत नसायचा . वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या अश्या असंख्य पत्रांचा खजिना आपल्या जीवाइतकाच जपून ठेवायचा . सुखः - दुःखाच्या भावना व्यक्त करण्याचा पत्रांच्या माध्यमातला हा अनुभव आजच्या ह्या २१ व्या शतकातल्या Instant माध्यमांतून मिळणं अशक्यच आहे .
आज कोणासोबतही अगदी सहजपणे Connect होता येतं पण तेच त्यांनतर Connected राहणं सगळ्यांनाच जमत नाही.आज लोकांना एकत्रित आणणं तसं फारसं अवघड नाहीये . एक कोणी तरी ग्रुप बनवतो , त्यात लोकांना Add करतो आणि सगळे Connect होतात . पूर्वी लॊकांना Connected राहण्याची माध्यमं तशी मर्यादित होती पण त्यांच्यात असणारं प्रेमाचं , विश्वासाचं Connection हे कधीच कमी व्हायचं नाही . त्याउलट ह्या पत्रांच्या माध्यमांतून ते आणखी दृढ व्हायचं .
खरं तर असं पत्राबद्दलच लिहिण्यापेक्षा , मुळात कोणासाठी तरी खरं पत्रं लिहायचं , ते पाठवायचं आणि त्या पत्राच्या उत्तराची वाट बघून ते पत्र मिळाल्याचा व ते वाचण्याचा अनुभव प्रत्यक्षात घेतल्या शिवाय पत्र म्हणजे काय ते कधी कळणारच नाही . म्हणूनच एक तरी पत्र लिहून ते पाठवायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही असं मला मनापासून वाटतं .
म्हणूनच पत्रास कारण की .....................
सुनित कुलकर्णी
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा