सहजच.......
आज आपल्या आयुष्यात आपण हा जगण्यातला सहज पणा कुठे तरी हरवून तर बसलेलो नाही ना असं मनापासून वाटतं. साधं व्यक्त होण्यासाठी सुध्दा आपल्याला कारण हवं असतं. कधी कोणाला सहज हसावंसं वाटलं , किंवा सहजच रडावसं वाटलं तेव्हा तो ते सुद्धा व्यक्त होत नाही कारण कोणतंही कारण नसतांना हसणाऱ्या आणि रडणाऱ्याला आपण अगदी सहजपणे तो वेडा आहे हे ठरवून मोकळे होतो. म्हणूनच कितीही वाटलं तरीही आपण तसं करू शकत नाही . तेच जर आपल्या ओळखीतले असो किंवा कोणतंही एखाद लहान बाळ जेव्हा खळखळून हसले किंवा रडले तर आपण त्याला वेडे म्हणत नाही, त्या बाळाला काही कळत नाही, बोलता येत नाही म्हणून ते हसणं आणि रडण्यातून व्यक्त होतेय असं आपण म्हणतो. त्याच्या त्या निरागस आणि सहज हसण्यामुळे नकळत का असेना आपल्या ओठांवर हसू येतं छान वाटते आणि या उलट जर तेच बाळ रडत असेल तर आपणही थोडे अस्वस्थ होतो, त्यांचे रडणं थांबवण्यासाठी त्या वेळेला आपल्याला हे शक्य आहे ते करतो.
वर दिलेल्या ह्या बाळाच्या उदाहरणात मला एक जाणवलं त्या बाळाला काहीच समजत जरी नसले तरी ते किती सहज पणे कोणाचाही विचार न करता ते व्यक्त होते. ते जे काही कृती असो अगदी सहज पणाने करून मोकळे होते . हा आयुष्यातला असलेला सहज पणा जर त्या निरागस बाळाला समजत जरी नसला तरी तो अगदी सहज पणाने व्यक्त करता येतं. आज आपण सगळेच तर असे एकदम मोठे तर नाही झालो तर कोण्याएके काळी आपणही ते लहान बाळ होतोच की , मग हाच आयुष्य जगण्यात असलेला सहज पणा त्या लहानशा बाळाला व्यक्त करता येतो तोच सहजपणा आपल्याला का व्यक्त करता येत नाही ?? का आपण व्यक्त होत नाही????? हा विचार नक्कीच आपल्याला करायची गरज आहे असं मला वाटते.
हा लेख विषयाला किती धरून आहे हे माहीत नाही . पण मला जे सहज सुचलं तेच मी व्यक्त केलंय हे मात्र नक्की..... म्हणूनच अगदी सहजच लिहलंय .......
सुनित कुलकर्णी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा