दान....

                                          


                    दान म्हणजे आपल्या जवळ जे आहे, ते स्वतःहून चांगल्या भावनेने, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता आणि सगळ्यात महत्वाचं आनंदाने  जे मनापासून दिलं  जातं ते  म्हणजे दान..... दान हे कधीही कोणावर लादता येत नाही. आपल्या संस्कृतीत सुद्धा दान  खूप महत्वाचं  आहे. आपल्या उपनिषदांत  विकसित व्यक्तीसाठी तीन महत्वाचे गुण आत्मसात / शिकण्यासाठी सांगितलेले आहेत. सयंम, दान  आणि दया.   ।। तदेतत्त्रयँ शिक्षेद् दमं दानं दयामिति ।।  ऋग्वेदात  दान या बद्दल खूप गोष्टी सांगिलेल्या आहेत. ऋग्वेदानुसार दान म्हणजे सत्य. चांडोक्य  उपनिषदानुसार समस्त मानव जातीसाठी जीवन जगतांना  तप, आर्जव, सत्यवचन  अहिंसा आणि दान  हे महत्वाचे सांगितलेले आहे. या वरूनच आपल्याला  असं  लक्षात येतं  की  व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने दान सुद्धा किती महत्वाचं  आहे. श्री.भगवद्गीतेत  चार युगांच्या  वर्णनासोबतच धर्माच्या चार स्तंभांचे वर्णन केलेलं  आणि ते सत्य (सत्य), कठोर परिश्रम (तप), मनाची शुद्धता (पवित्रता) आणि दान (दया आणि दान) आहेत. श्री.भगवद्गीतेत  १७.२० ते १७.२२ श्लोकांमध्ये विविध प्रकारच्या दानांचे वर्णन केलेलं  आहे. त्याचे थोडक्यात  तात्पर्य  असे की  योग्य व्यक्तीला दिलेले दान, त्या बदल्यात कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी देणे योग्य आहे

                    दान च्या बाबतीत कोणीही श्रेष्ठ आणि  कनिष्ठ असा  भेद कधीही नसतो. तुम्ही काय दान करताय, किती प्रमाणात दान करताय ह्यापेक्षा तुम्ही काहीतरी दान करताय ह्याला जास्त महत्व आहे आणि तुम्ही ते दिल्यानंतर कॊणत्याही प्रकारच्या परताव्याची अपेक्षा करायची नाहीये. तुम्ही काहीतरी दान करताय ह्यात सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या आहेत जसं  की  तुम्ही दिलेल्या दाना नंतर त्या केलेल्या दानामुळे कोणाला अपाय तर होणार नाहीये ही  दक्षता महत्वाची. एक साधं  उदाहरण देतो. काहीही  दान म्हणून जर कोणी समाजविघातक घटकांना काही गोष्टी दान केल्यात तर असं समाजविरोधी दान हे योग्य ठरणार नाही. 

                    आपल्या शास्त्रांत काही महत्वाचे दान कोणती हे सांगितलेलं आहे. त्यात कन्यादान, अर्थदान, गोदान, भूदान, अभयदान, औषधदान, स्वर्णदान, श्रमदान, अन्नदान, विद्यादान / ज्ञानदान   इ. हे सांगितलेले आहेत. काळ बदलला आणि गरजे  प्रमाणे ह्यात आणखी काही जी  मी  त्यात  रक्तदान, नेत्रदान, अवयव दान (Tissue Donation), शरीरदान, Internet Data  दान 😉😉😉,  समाविष्ट करतोय. ह्यातल्या प्रत्येक दान बद्द्दल मी सविस्तर चर्चा करणार नाहीये, कारण ह्यातल्या प्रत्येक दानाचं धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या महत्व आहेच.   

                    अन्नदान हे  सामाजिक दृष्टीने सुद्धा एक खूप दान आहे. पूर्वी  शाळा ह्या काही ठराविक गावातच असायच्या शिक्षणासाठी मुलांना बाहेर गावी जावं  लागायचं, शाळेत  वसतिगृह आणि  जेवणाची  व्यवस्था असायची पण सगळ्यांना ते परवडायचं असं नव्हतं.  गावातले असो वा  शहरातले लोक सगळ्यांचीच परिस्थिती तशी बेताचीच असायची  पण तरीही शहरातली लोक दूर-दूरच्या गावांतून आलेल्या मुलांना आठवड्याच्या १-१ वाराला आपल्या घरी जेवायला देत असत. यामाध्यमातून मुलांच्या  शिक्षणासाठी लोकं त्यांच्या - त्यांच्या  परीने एकमेकांना मदत करायचे आणि  त्याच जाणिवेतून शिक्षण घेतलेली ही  मुलें  पुढे समाजोपयोगी, देशासाठी कार्य करायचे. ह्यात तशी बरीच लोकांची, समाजसेवकांची उदाहरणे देता येतील.  उदा.श्री.गोपाळ गणेश आगरकर. पण अन्न  दान च्या  बाबतीत लोकांत काही संभ्रम आहेत. लग्न  किंवा इतर  कार्यात आपण लोकांना म्हणजेच आपल्या अतिथी, आप्तेष्टानां जे जेवण देतो ते अन्न दान समजतात.  जे आधीच संतुष्ट आहेत अश्या लोंकाना अन्नदान केलं हे म्हणणं  चुकीचं  ठरेल. 

                    एक गंमतीचा भाग म्हणून सांगायचं  तर आजच्या Smartphone  च्या  युगात अन्न, वस्त्र, निवारा ह्या जीवनावश्यक घटकांसोबतच  Internet Data  तितकाच महत्वाचा झालेला  आहे  😉😉😉😉. त्यामुळे कधीच जर  एखाद्याचा Internet Data  संपलाच तर काही  चांगले दानशूर मित्र  Hotspot ने  Internet Share  करून  तारणहार होतात. विद्यादान / ज्ञानदान हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ज्ञान ही  अशी गोष्ट आहे जी  आपण जितकं  आपण देतो तितकंच  ते आपलंही  वाढतं.  श्रमदान सुद्धा खूप महत्वाचं  आहे, ह्यात श्रमदानाच्या माध्यमांतून बरेच लोक समाजकार्य करतात. काही गावांत  लोकांनी श्रमदानाच्या माध्यमातून  गावातली स्वच्छता करतात, विहिरी, शेततळे  खोदून त्यांनी त्यांच्या गावातील विविध समस्यांचे  निदान केलेलं आहे. 

                    जस जसा काळ बदलत गेला, माणसाने सगळ्याच क्षेत्रांत  खूप प्रगती केली, संशोधन केलें. प्रगती आणि संशोधन हे कधीच न थांबणारं  आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मी माझे पुढील विधान करणार आहे ते अवयव दान, नेत्रदान आणि शरीरदान (देहदान) याबद्दल. आज विज्ञान इतकं  पुढे गेलेलं आहे की मृत्यूनंतरच्या काही ठराविक कालावधी पर्यंत  त्या मृत शरीरातले काही  अवयव, नेत्र, पेशी  हे गरजू रुग्णांना देऊन त्यांचे प्राण वाचवू शकतो. नेत्रदानाच्या बाबतीत मला हे खूप महत्वाचं वाटतं. आज असे असंख्य लोकं  आहेत ज्यांना द्रुष्टी नाही, त्यांना ह्या नेत्रदानाच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं  जीवन बदलू शकेल. मी स्वतः त्यासंदभातली नोंदणी केलेली आहे म्हणून मी  हे नक्कीच तुम्हाला हे सांगू शकतो. मृत झालेलं शरीर हे  वैद्यकीय महाविद्यालयाला  दान करून  त्या विद्यार्थ्यांना  मानवी शरीर संशोधनासाठी  खूप चांगला उपयोग होऊ शकतो. अवयव दान, नेत्रदान, देहदान याची तितकीशी  जन  जागृती भारतात तरी नाहीये. मुळातच ह्या बद्दल दोन वेगळे मत प्रवाह आहेत आणि कदाचित ह्याच गोष्टीमुळे आपल्या कडे असंख्य रुग्ण हे waiting वर  आहेत  आणि बरेच रुग्ण हे वेळेच्या अभावामुळे दगावतात. 

                    रक्तदान हे श्रेष्ठ दान असं  म्हटलं जातं. मला  रक्त दान हा शब्दच  मान्य  नाही. कारण मूळातच  शरीरात रक्त बनण्यात माझे काहीच प्रयत्न नसतात. ते निसर्गतः शरीरात तयार होते, ते तयार होण्यात माझा कोणताच सहभाग नाहीये.  त्यामुळे मी  ते देण्याचं फक्त एक माध्यम आहे  म्हणून मी ते दान असं  म्हणणार नाही. माझ्या मते रक्त देण्यासाठी शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम असणं  जितकं  गरजेचं आहे तितकंच मानसिक दृष्ट्या सुद्धा तयार असणे  गरजेचं आहे. ज्याप्रमाणे कोणतंही  काम आनंदाने, चांगल्या मनाने  करतो तेच रक्त देतांना  सुद्धा चांगली हवी. आज असे खूप गरजू रुग्ण ज्यांना रक्ताची नितांत गरज असते. यात मुख्यत्वे Thalassemia असलेल्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज असते. माझ्या स्वानुभवावरून  सांगतो जेव्हा पहिल्यांदा रक्त दिलें तेव्हा त्या सुईची खूप भीती वाटली होती पण नंतर सवय झाली. रक्त देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते मिळणारं  समाधान काहीतरी वेगळंच असतं, जे खरं तर शब्दात सांगतात येणार नाही, ते खरं तर प्रत्यक्षात अनुभवण्यात आहे. 

                    वर जसा मी संशोधनाच्या बाबतीत थोडा उल्लेख केला आहे आणि असलेलं वास्तव बघून  मला एक जाणवलं की  सुदैवाने अजून पर्यंत तरी रक्त हे कृत्रिम रित्या कसं  बनवलं  जातं  हा शोध लागलेला माझ्या तरी ऐकण्यात आलेलं  नाहीये. त्यामुळे निदान आज तरी माणूस हा रक्तासाठी दुसऱ्या माणसावर अवलंबून आहे. आणि जोवर रक्त बनवण्याचा शोध लागून त्याचा कारखाना सुरु होऊन हवी ती किंमत देऊन रक्त बाजारात मिळणार नाही तो पर्यंत तरी निदान जी  काही  थोडीफार माणसाला माणसाची कदर, नात्यांची कदर आणि  माणुसकी शिल्लक तरी राहील. जेव्हा कधी हा शोध लागेल, रक्त बनवून ते बाजारात सहज उपलब्ध होईल त्यावेळी काय  परिस्थिती निर्माण होईल ह्याबद्दल आज  विचार करणं अवघडच असो .....  

                   थोडं वेगळं आणि धाडसी मत हे मांडतोय,  ह्या पृथ्वीतला वर कोणताही सजीव असेल त्याला  माणूस म्हटलं की त्याला आयुष्य जगण्यासाठी काही  कालावधी असतोच. आपल्यात अशी बरीच  माणसे अशी आहेत / होती . ज्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांपर्यन्त सगळ्यांना काहीतरी देऊनच गेलेले आहेत ह्याच चांगले विचार, संशोधन इतर बऱ्याच गोष्टी आणि अगदी आपण उपभोगत असलेलं स्वातंत्र्य सुद्धा .....त्यांची दूरदृष्टी , उत्साह आणि  इतरांसाठी काहीतरी चांगलं करणं , चांगलं व्हावं हा विचार आहे परंतु  निर्सगाच्या नियमाप्रमाणे शरीर साथ देत नाही आणि  त्यांना हा देह सोडावा लागतोच आणि राहिलेलं ते काम , तो विचार पूर्ण व्हायचा राहतो. खरं तर अश्या लोकांना मला  माझ्या आयुष्यातली काही वर्षे  किंबहुना माझं पूर्ण आयुष्य जर मला देता आलं असतं तर मी निःसंकोच आनंदाने केले असतं . मी ह्याला दान हा शब्द आवर्जून वापरला नाहीये , कारण ह्या लोकांचं कार्य , विचार आणि जिद्द अशी आहे की  त्यापुढे माझं हे आयुष्य काहीच नाही. 

                    दान कसं करावं  आणि कोणाला करावं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. दान हे नेहमी गुप्त असावं . इतकं गुप्त की उजव्या हाताने केलेलं  दान हे डाव्या हाताला सुद्धा कळायला नको. ते कोणत्याही स्वरूपात केलं तरी ते कधीही कोणालाही बोलवून दाखवू नये, तसं  जर करत असाल तर  त्याला दान म्हणताच येणार नाही कधी.  दान कोणतंही करा अगदी मनापासून आणि आनंदाने करा. दान करून कोणीही कधीच लहान -मोठा होत नसतो. दान केल्यानंतर मिळणारं ते समाधान शब्दातीत आहे. 

                                                                                                              सुनित  कुलकर्णी 
                                                                                                      (+९ १  ९ ४ २ २ २ ९ २ ८ २ ० )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............