नविन वर्ष ............


                    

                    सांस्कृतिक दृष्टीने आपलं  नवीन वर्ष हे कोणत्याही महिन्यात / तिथीने सुरु हॊत असलं  तरीही आपल्या सगळ्यांच्याच  व्यावहारिक आयुष्यात तारखेला खूप महत्व आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात जन्माच्या दाखल्यापासून सुरु झालेला हा तारखांचा प्रवास आपल्या मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अविरतपणे सुरूच असतो. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यात काही विशिष्ट तारखा आणि काही  महिने ह्या खूप महत्वाच्या असतात आणि  त्याच्या अश्या बऱ्याच आठवणीही असतात . 

                     एक सहजच उदाहरण द्यायचं  झालंच  तर आपला / आपल्या जवळच्या माणसांचा पहिला  वाढदिवस,  जून महिन्यात असलेला पहिला शाळेतला दिवस, मार्च/ एप्रिल मध्ये असणाऱ्या शालांत  ( वार्षिक) परीक्षा, १० , १२ वीच्या असणाऱ्या फेब्रुवारी /मार्च महिन्यात असणाऱ्या परीक्षा,नॊकरीचा पहिला दिवस,  कोणतीही नवीन गोष्ट जसे की  नियमित व्यायामाला सुरुवात ही  नेहमी महिन्याच्या १ तारखे पासूनच सुरु करायची असते, मग ती कोणत्याही नवीन महिन्याची आणि १  जानेवारी म्हणजे अगदी पर्वणीच 😉 . त्यानंतर त्यात सातत्य किती दिवस राहतं तो भाग वेगळाच पण महिन्याची १ तारीख म्हणजे १ तारीखच 😀😀, पदवी मिळाल्याची, पुरस्कार ,  मिळाल्याची  तारीख ...... पण काही प्रसंगासाठी  ती विशेष तारीख असं  पटकन आठवणं  कठीण आहे पण वर्ष मात्र कायम लक्षात राहतं .

 नॊकरीत आपापल्या क्षेत्राप्रमाणे असलेले तिमाही  महिने  ( मराठीत सांगायचे झाले तर Quarter End  चे महिने), ३१ मार्च, Year  End , लग्नाचा वाढदिवस, पगाराच्या तारखेवर अवलंबून असलेले कर्जाचे हफ्ते आणि संपूर्ण महिन्याचं  व्यावहारिक नियोजन , खूप वर्ष नॊकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीचे वर्ष.......  त्यानंतर मात्र हळूहळू आयुष्यात असणारं  तारखांचे  महत्व  तितकंसं  कमी होत जातं . जर सेवानिवृत्ती नंतर पेन्शन मिळत असेल तर त्या ठराविक तारखेला पेन्शन जमा होते आहे का , आपण जिवंत आहोत ह्याचे प्रमाण देण्यासाठी वर्षातून १ वेळा एका विशिष्ट महिन्यात जीवन प्रमाण देण्यासाठी बँकेत  जावं  लागतं ,आणि जन्माच्या दाखल्यापासून सुरु झालेला तारखांचा  प्रवास आपल्या मृत्यूच्या दाखल्यापर्यंत येऊन संपतो एकदाचा....  आपल्या नावाला जोडली गेलेली ती तारीख शेवटची कधीच पुढे सरकत नाही. कुठे तरी भितींवर आपल्याच  एका चांगल्या फोटोखाली जन्मआणि मृत्यू अशी तारीख नमूद करून हा प्रवास नमुद केलेला असतो..... 

                    आपला आनंद , दुःख ह्या सगळ्या भावना काही विशिष्ट तारखांना कुठे तरी नक्कीच जोडल्या गेलेल्या आहेत हे  तितकंच  नक्की. आपल्या वाढदिवसाला आठवणीने मिळालेल्या शुभेच्छा , तारखेला बँक खात्यात  Salary  Credited  चा message  वाचण्याचा आनंद अश्या आनंदाच्या क्षणांसोबतच काही दुःखाचे हे प्रसंग, क्षण घडून गेलेले  असतात. काही हरवलं असल्याचं, न मिळाल्याचं आणि कोणीतरी  कायमचं  सोडून गेल्याचं  दुःख  हे  खरं  तर शब्दांत सुद्धा व्यक्त करायला खूप कठीण असतं. 

                    खरं  तर येत्या काही तासांतच आपण एका नव्या व्यावहारिक वर्षात पदार्पण करणार आहोत. तसं  बघायला गेलं  तर नेहमी सारखाच दिवस आणि रोजचं  आपलं  routine असतं . नवीन वर्षाचं  कालनिर्णय येतं , वाढदिवस आणि सुट्ट्या कधी आहेत, जोडून किती सुट्ट्या आल्यात, Govt  Holiday  रविवारी आल्यामुळे किती सुट्ट्या गेल्यात हे आपण आवर्जून बघत असतो 😃😃. सरत्या  ह्या वर्षात काय मिळवलं, काय गमावलं  हा विचार येतोच.आयुष्यात अश्या चांगल्या - वाईट अनुभवांची  बेरीज-वजाबाकी करून त्याचं  गणित कधीच मांडता येत नाही. 

                    शेवटी जे काही मिळवलं ते टिकवण्याचा प्रयत्न करायचा आणि  काही चुकलं त्यातून  काहीतरी नवीन  शिकण्याचा बॊध  घायचा.  जे गमावलं  ते पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि जे कायमचं  गमावून बसलोय त्याबद्दल मनातलं थोडं ओझं  कमी करायचं,  त्यांच्या चांगल्या आठवणी  जपून ठेवायच्या , नवीन माणसे , चांगले विचार , चांगल्या सवयी जोपासायच्या  आणि त्यात सातत्य ठेवायचं .  आपल्या जवळची माणसं त्यांना जपायचं .   सरत्या वर्षात जे काही चांगले - वाईट घडलं आणि  नवीन वर्षात जे घडणार  ते सकारात्मक दृष्टीने स्विकारायचं आणि  पुढे जात राहायचं. हेच तर आयुष्य आहे.

                  आयुष्य हे खूप अनाकलनीय आहे कधी काय घडेल मग ते चांगले  असो  की वाईट काहीच काहीच सांगता येत नाही. आनंदाने  येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करायचे आणि समस्त विश्वा साठी हे येणारं  नवीन वर्ष सुखी- समाधानी आणि आरोग्यदायी जावो अशी मनोकामना करायची  ........

                                                                                                                                सुनित कुलकर्णी 
                                                                                                                             +९ १  ९ ४ २ २ २ ९ २ ८ २ ० 

 इंग्रजी लेख ( For English Blog )

                              






टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............