वेदना ...................

वेदना........... ह्या पृथ्वीतलावर असा कोणताच सजीव प्राणी नसेल ज्याने वेदना कधीच अनुभवलेल्या नसतील. शारीरिक वेदना तर ह्या सगळ्यांना सारख्याच असतात. शारीरिक वेदनेचं स्वरूप कमी जास्त प्रमाणात असलं तरीही भावना तर त्याच असतात . वेदना म्हणजे नक्की काय अशी व्याख्या तर नाहीये . कारण वेदना हा एक अनुभव आहे आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असतो. वेदना हा असा अनुभव आहे जो ज्याला त्याला आपला आपलाच घ्यावा लागतो.काही शारीरिक वेदना ह्या क्षणिक असतात तर काही दूरगामी असतात . काही शारीरिक वेदनांसाठी कधी कधी साधी हवेची फुंकर सुद्धा पुष्कळ असते तर काही वेदनांना कितीही औषध घेतलं तरीही वेदना कधी कमी होत नाहीत. मानसिक वेदनांच्या बाबतीत अगदी तसेच असतं ना त्यावर कोणतं औषध घेता येतं आणि ते कधी बरं होईल ह्याचा काही ठराविक कालावधी असतो.
तसं बघितलं तर ह्या पृथ्वीतलवार जो कोणी सजीव आहे त्यांना सगळ्यांना वेदना आहेत . फरक इतकाच असतो की या सगळ्यांत मनुष्य प्राणी सोडला तर इतर कोणत्याही प्राण्याला होत असलेल्या वेदना बोलून किंवा शब्दांत लिहून कोणाला सांगता येत नाही म्हणून ते अश्रूंच्या माध्यमातून, काही विशिष्ट कृतीच्या व्यक्त करतात. माणसाला सुद्धा बऱ्याच वेळा असणाऱ्या वेदना ह्या त्याला बोलता येत असूनही कोणाला सांगता येत नाही किंबहुना त्या तो कोणासोबत व्यक्त करू शकत नाही मग अश्या वेळी तो सुद्धा अश्रूंच्या माध्यमातून वेदना व्यक्त करतो. ते कधी कधी टचकन डोळयांतून पाणी येतं ते हेच असतं.
ज्याप्रमाणे प्रत्येकालाच आपल्याला मिळालेलं दुःख हे खूप मोठं वाटत असतं वेदनांच्या बाबतीतही अगदी तसंच आहे . हा मनुष्य स्वभाव आहे . होत असलेल्या वेदना ह्या बऱ्याच वेळा अश्रूंच्या रूपाने सहज व्यक्त होतात. कारण आपल्या डोळ्यांतून पडणाऱ्या त्या अश्रूंमूळे काही वेळा ह्या वेदना कमी होत नसतीलही पण त्यावेळी कोणी सोबत नसतांना त्यावेळी आलेल्या त्या अश्रूंची साथ खूप अनमोल असते . वेदना होण्यासाठी कारणं काहीही असू शकतात आणि वेदना ह्या सगळ्यानांच होत असतात फक्त त्याचे स्वरूप वेगळं असतं . म्हणूनच दुसऱ्याला हॊणाऱ्या वेदना जर आपण स्वतः कधी अनुभवलेल्या असतील तर आपण निदान समजून घेऊ शकतो . पण त्या वेदनांत प्रत्येकाचाच अनुभव सारखाच असेल असं नाही.
होणाऱ्या वेदना ह्या कधीच कमी - जास्त अश्या मापदंडात कधीच तोलता येत नाहीत. वेदनांमुळे व्यक्त होतांना इतकी काळजी नक्कीच घ्यावी की जेणे करून त्याच्यामुळे इतरांना त्याचा काही त्रास सहन करावा लागेल . कारण काही वेळा त्या वेदेनेच्या वेळी उचललेल्या त्या पावला मुळॆ , त्या कृतीमुळे त्यांच्या वेदना कमी होत असतील किंवा त्या वेदनेतून त्यांची कायमची सुटका देखील ते करवून घेत असतील पण त्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या माणसांना आयुष्यभरासाठी ते अशी वेदना देऊन जातात की त्यांची कधीच भरपाई करता येत नाही . त्यांची काहीच चूक नसतांना ते नकळतच त्यात भरडत जातात आणि त्यांचं अवघं आयुष्य संपतं पण त्या वेदना आणि त्यांची तीव्रता कधीच कमी होत नाही . म्हणूनच वेदना असह्य झाल्यावर कोणतंही पाऊल उचलतांना , कोणतीही कृती करतांना स्वतःचा विचार करण्यासोबतच आपल्याला जवळच्या माणसांचा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे.
त्या हॊणाऱ्या वेदना कोणत्या दृष्टीकोनातून घेतोय ते सुद्धा खूप महत्वाचं आहे . काही वेळा होणाऱ्या वेदनेतून मिळणाऱ्या अनुभवातून काहीतरी शिकायला सुद्धा मिळू शकतं . तर काहीतरी चांगलं नवीन सुद्धा घडवलं जाऊ शकतं . काहीवेळा मिळणाऱ्या वेदनेतून आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवता सुद्धा येतं तर कधी कधी ते बिघडवलं सुद्धा जाऊ शकतं . म्हणूनच वेदना होत असतांना स्वार्थी न होता थोडं इतरांच्या वेदना बघितल्या तरीही आपल्या असहाय्य वाटणाऱ्या वेदना सहन करण्याची ताकद मिळते आणि असलेल्या प्रसंगातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळते .
म्हणूनच वेदना कॊणत्याही असो कधीच खचू नका . सकारात्मक रहा .
ये वक्त भी गुजर जायेगा .........
सुनित कुलकर्णी
०९४२२२९२८२०
Good writing! Keep it up.
उत्तर द्याहटवाThank you
हटवा