मोठं ........
मो ठं .....होणं म्हणजे नक्की काय ???? आणि कधी समजायचं मोठं झालोय ते. लहान असतांना आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडलेला हा प्रश्न आणि त्यात आपण जर भावंडात लहान असतो तेव्हा तर खूप वेळा मनात आलेला , परिस्थिती अनुभवतांना पडलेला हा प्रश्न ( मी कुटूंबात शेंड फळ आहे म्हणूनच हे मी अगदी माझ्या स्वानुभवावरून सांगतोय 😀😀) त्यावेळी तू हे करू नकोस लहान आहेस . लहानपणी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केल्यावर तू मोठा झाल्यावर नक्की असं म्हणून सगळ्यांच्या पालकांनी ती हट्टाची वेळ कितीतरी तरी वेळा सहज हाताळली असतेच.
मोठ्या माणसाबद्दल सर्व सामान्य कल्पना अशी की सदर व्यक्ती जर एखाद्या उच्चपदावर कार्यरत असेल , जर त्यांच्याकडे खूप आर्थिक विद्वत्ता असेल , त्याच्या खूप प्रसिद्ध आणि उच्चपद घोषवणाऱ्या व्यक्तींसोबत नियमित उठणं -बसणं असणाऱ्याला तो व्यक्ती मोठा माणूस आहे असं म्हंटलं जातं . तसं बघायला गेलं तर आपल्यापेक्षा उंचीने , वयाने ,मानाने आणि कर्तृत्वाने कोणीतरी मोठं असतंच . त्यामुळे नक्की मोठं झालोय हे कधी समजायचं हा प्रश्न सगळ्यांनाच नक्कीच असतो. ह्या पृथ्वीतलावर कोणताही सजीव प्राणी असला तर काळाप्रमाणे त्यात निसर्गतः काही बदल होणं हे अपेक्षित असतं. जर मनुष्य प्राण्याबद्दल आपण जर बघितलं जीव हा गर्भधारणेत हळू हळू वाढत जातो आणि एका विशिष्ट कालावधी नंतर ह्या जगात त्याचा प्रवास सुरु होतो. त्या गर्भातील जीवाचा तो प्रवास लहानापासून मोठं होण्याचा प्रवास ह्या जगात असे पर्यंत कधी संपतच नाही .
मोठं असणं , मोठं होणं हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीये . मोठं असलं की जबाबदारीने , जे आपल्या आहेत त्या सगळ्यांना काळजीने सांभाळायचं असतं , मोठं असणं म्हणजे काही असलेल्या अनुभवाच्या आधारावर योग्य ते निर्णय घ्यायचे असतात. साधारणपणे ५ ० - ६ ० वर्षांपूर्वी एकत्रित कुटूंबात राहण्याची पद्धत होती . त्यामुळे घरात आजी आजोबा त्यांची मुले आणि नातवंडे असा मोठा परिवार असायचा , त्यात प्रत्येक पिढीतला मोठा एक जो त्याला मोठं म्हणून दिलेली जबाबदारी अगदी खंबीरपणे पार पाडत असत . घरातला मोठा मुलगा हा त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या भावंडांची वडिलांसारखी काळजी घेत असत तर घरातली मोठी मुलगी ही त्यांना अगदी आई सारखी माया करत असत . हे चित्र आज अजिबातच नाहीये असं मला मुळीच म्हणायचं नाहीये .
सगळ्यांनाच मोठं व्हायचे असते , वयाने , उंचीने मोठे होणे हा निसर्गतः नियम असला तरीही कर्तुत्वाने मोठें होणे हे मात्र आपल्या हातात आहे ( इथे मी जाणीवपूर्व आर्थिक निकषांनी मोठं असणं नमूद करत नाहीये )आपल्या इतिहासात सुद्धा अशी बरीच उदाहरणं आहेत. रामायणात प्रभू श्री राम आणि सीता माता ह्यांचे त्यांच्या भावंडा , प्रति असलेलं नातं . महाभारतात महाराज युधिष्टिर आणि इतर ४ पांडव ह्यांचं नातं असो , श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी आपल्या मोठ्या भावालाच गुरुम्हणून स्वीकारलं आणि महाराज स्वतः वयाने खुप लहान वयात लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सगळयांना बोध देणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजीराजे व असे बरेच शुरवीर होऊन गेलेत ज्यांनी खूप लहान वयात असं कर्तृत्व दाखवलं आणि मोठ्या - मोठ्यांना थक्क केलं . म्हणूनच जेव्हा कर्तृत्व सिद्ध करायची वेळ असते तेव्हा लहान - मोठं काहीच नसतं .
काही वेळा परिस्थिती बघून थोडे लहान सुद्धा होत आलं पाहिजे. मोठं असलं की मान मिळतोच पण तो मान मिळवण्यासाठी मोठं असल्यासारखं आचरण, कृती सुद्धा हवी असते. आपण मोठं आहोत म्हणून आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्यावर मत, निर्णय लादणे , त्यांच्या मताचा अनादर करणं , त्यांना गृहीत धरणे असं होत नाही. सगळ्यांना सांभाळून घेणं, सगळ्यांच्या मतांचा , विचारांचा आदर ठेवणे हा सुद्धा मोठेपणा आहे. नुसतं वयाने आणि मानाने मोठं असून उपयोग नाही. मोठं असल्यासारखं कर्तुत्व सुद्धा हवं.... काहीवेळा वय लहान असतं पण कर्तृत्व मोठं असतं अश्यावेळी आदर - मान हा मिळतोच .
बालपण हे असं आहे ओंजळीत भरलेल्या त्या पाण्यासारखं असतं जे थेंब थेंब करत ओंजळीतून कधी निघून जातं समजत नाही पण ओंजळीत असतांना पाण्याच्या त्या स्पर्शासारखं कायम आठवणींत राहतं ते बालपण. म्हणूनच आयुष्यात मोठं असण्याची , बनण्याची खूप संधी मिळते पण क्वचितच थोड्यावेळासाठी लहान होण्याची संधी मिळत असते . ......
धन्यवाद
सुनित कुलकर्णी
+९ १ ९ ४ २ २ २ ९ २ ८ २ ०
+९ १ ९ ४ २ २ २ ९ २ ८ २ ०

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा