मी माझा ........

 

                    प्रत्येकासाठी त्याचं  नाव हे   महत्वाचं असतंच. जन्म झाल्यावर पालकांना जे योग्य वाटतं त्याप्रमाणे ते नाव ठेवतात,आणि व्यक्तीला त्या नावाने ओळख  मिळते. जन्माच्या  दाखल्यापासून  नावाचा हा  प्रवास सुरु होतो . त्यावेळी   जेव्हा कधी आपण स्वतःची ओळख करून देतो , तेव्हा मी ......  , मी ......  शिक्षण घेतलं  आहे आणि ....... काम करतो / पदावर कार्यरत आहे . सगळ्यांनाच स्वतःची त्या असलेल्या नावाने असो वा  कर्तृत्वाने एक विशेष ओळख आहेच. समाजात वावरत असतांना जी ओळख असते तीच त्यांचं अस्तित्वच होऊन जाते.  

                    खरं तर आयुष्य हे रंगमंच आहे आणि आपण प्रत्येकजण आपआपली  भूमिका सादर करतोय .ह्या बद्दल मराठी साहित्यात संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली  हेच म्हणतात . तसंच  जग विख्यात कवी आणि नाटककार  विल्यम शेक्सपिअर  ह्यांच्या As You Like It ह्या नाटकात All the world's a stage, And all the men and women merely players म्हणजेच संपूर्ण जग हे एक रंगमंच आहे, आणि सर्व पुरुष आणि स्त्रिया केवळ कलाकार आहेत, असा उल्लेख आहे. व्यक्ती हा  जन्माला आल्यापासून आयुष्याच्या विविध टप्प्यात वेगवेगळ्या भूमिका जगत असतो. जसे की आई - वडिलांसाठी त्यांचं मूल म्हणून, त्यासोबतच असणाऱ्या नात्यांच्या, शाळेत आणि महाविद्यालयात विदयार्थी आणि मित्र, शिक्षण पूर्ण झाल्यावर जे काम करतो उदा. अभियंता, डॉक्टर , कलाकार व इतर जे काम करू त्या भूमिकेत ,लग्न झाल्यावर पती / पत्नी च्या , मुलांसाठी आई -बाबां म्हणून आणि त्यावेळेच्या असलेल्या परिस्थितीप्रमाणे अश्या कळत -नकळत कितीतरी भूमिका आपण जगत असतो. ह्या भूमिका जगत असतांना ज्या ज्या ठिकाणी जी योग्य आहे तीच भूमिका सांभाळणं  हे सुद्धा तितकंच  महत्वाचं असतं. 

                    एक चांगलं उदाहरण द्यायचं झालंच तर आपण चित्रपट / नाटक बघतो, त्यात तो अभिनेता / ती अभिनेत्री  रंगमंचावर त्या कथेतील असणाऱ्या काल्पनिक पात्रापणे ती भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने सादर करतात. पात्रातील भूमिका संपवून  तो त्याच्या वास्तविक रूपात येतो. त्या संपलेल्या खेळानंतर त्या अभिनेत्याला / अभिनेत्रीला किंवा प्रेक्षकांना नंतर कितीही वाटलं  की  त्यांनी जे पात्र  सादर केलंय  आता त्याच भूमिकेत आयुष्यभर राहायचं ते शक्य नसतंच. ते  २ -३ तासांचा खेळ संपून त्याला कलाकाराला त्याच्या वास्तविक असलेल्या भूमिकेत यावंच  लागतं

                    तसं विचार केला तर आपण भूमिका जगत असतांना असं स्वतःसाठी जगलेलं ,स्वतः शीच कधी संवाद  केलेलं आठवतंय का ? ?? असं एकट्यातच  कधी मन - मोकळे पणाने  हसून , रडून व्यक्त होऊन बघितलंय कधी ? क्वचितच कधीतरी हे केलं  असेल .खरं तर आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो पण स्वतःसाठी मात्र कधीच वेळ नसतो किंबहुना तो असावा अशी गरजही आपल्याला वाटत नाही. कधी आरश्यासमोर बसल्यावर स्वतः कडे बघतांना  ह्या चेहऱ्याच्या पलीकडे जो मी आहे त्यासाठी सुद्धा जगता यायला हवं, त्याच्यासोबत संवाद साधता यायला हवं. आपण संपर्काच्या माध्यमांचा वापर करून अगदी सहज जगाशी जोडलो जातो पण कोणत्याही  माध्यमाशिवाय स्वतःशी संवाद साधायला आपल्याला का जमत नाही कधी  ?? का अवघड होतं ??? असं स्वतःसाठी  जगणं , स्वतः साठी थोडा वेळ काढून स्वतःशीच संवाद  साधणं  म्हणजे स्वार्थीपणा होत नाही.  

                    आपल्या प्राचीन शास्त्रांत आणि आजच्या आधुनिक मानसशास्त्रात  स्वतःशी संवाद  साधणं  म्हणजेच Self Talk बद्दल बरेच  निष्कर्ष आहेत. Self Talk  हे मानसिक आरोग्यासाठी आणि वैयक्तिक प्रगतीसाठी  खूप महत्त्वाचे आहे. स्वतःशी संवाद म्हणजे मनातल्या विचारांना स्पष्ट स्वरूप देणे, स्वतःशी बोलणे, स्वतःचे निरीक्षण करणे आणि आत्मपरीक्षण करणे. हा संवाद सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो, आणि त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ह्या विषयबद्दल भगवद्गीतेत सुद्धा "उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥"  प्रत्येक व्यक्तीने स्वतःलाच उन्नत करावे आणि स्वतःचा अधःपात होऊ देऊ नये. स्वतःशी संवाद योग्य प्रकारे केल्यास तो आपला मित्र बनतो, अन्यथा शत्रू ठरतो. असा उल्लेख आहे . म्हणूनच Self Talk  करणं  म्हणजे वेड लागणं  होत नाही. 

                    माझ्या मते Self Talk  साठी आपण व्यक्त होणं  हे खूप महत्वाचं असतं. माध्यम काहीही असो फक्त काळजी घ्यायची की त्या व्यक्त होण्यामुळे इतर कोणालाही शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होणार नाही इतकंच. कधी कधी व्यक्त होण्याची इच्छा  तर खूप असते पण कसं  व्यक्त व्हावं, कोण काय म्हणेल,  याचा विचार येतो आणि व्यक्त व्हायचं ते राहतंच. स्वतः साठी एकदातरी व्यक्त होऊन बघा. कोण किती like / share  करतंय ह्याचा विचार करू नका  .  हे मी माझ्या स्वानुभावावरून वरून सांगतोय . मी हा माझा Blog  लिहीतो आणि Social  Media वर  share  केल्यावर कोण किती like / Share करतंय  ह्याचा विचार करत नाही . Blog  post  केल्यानंतर नक्की तो  आनंद की  समाधान मिळतं हे शब्दांत  सांगणं  कठीण आहे. पण खूप छान वाटतं  हे मात्र नक्की....😀😀😀😀😀

                    आपण एखादं मनापासून काम करतो, त्यासाठी  प्रत्येकवेळी इतरांकडून पोचपावती मिळेलंच असं नाही , तेव्हा कधी -कधी आपणंच  आपल्या पाठीवर शाबासकीची  पाठ थोपटून घायची , इतरांकडून का म्हणून अपेक्षा करायची. दोन व्यक्तींची कितीही तुलना केली तरी  प्रत्येकाला त्याचं  असं  स्वतंत्र अस्तित्व आहे, प्रत्येकाचा आयुष्याचा प्रवासही  वेगळाच आहे . म्हणूनच कधी स्वतःची  तुलना इतर कोणासोबत ,कोणत्याच गोष्टीत कधीच करायची नाही.  . प्रत्येक  माणसाला  त्याचे  मत  असते  आणि  त्याला  त्याच मत हेच  बरोबर  आहे  हे  वाटणे हे स्वाभाविक आहे. त्यात काहीच  गैर नाही. फक्त  ह्यात  दुसर्‍याच्या  मताचा, विचाराचा  आदर  मात्र  केला पाहिजे. समोरचा माणूस कसा  वागतो हे आपल्या नियंत्रणात नसते, म्हणून त्याच्या वागण्याचा  स्वतःला  त्रास करून  घ्यायचा नाही

                    आपण  दुसऱ्याचं सुख ,दुःख ,वेदना आणि भावना ह्या एकवेळ समजून घेऊ  शकतो पण शेवटी ज्याला त्याला स्वतःलाच ते अनुभवावं , सोसावं  लागतं  हे वास्तव आहे. म्हणूनच प्रत्येकाचाच आयुष्याचा प्रवास ह्या त्याचा त्यालाच एकट्यानेच  करावा लागतो. अश्या ह्या प्रवासात मी असतो  माझ्यासोबत..  कधी पटकन अश्रु  म्हणून तर कधी ओठांवरच्या  हसू  रुपाने सहज व्यक्त होणारा  तो मी च असतो. जेव्हा आपण स्वतःला समजू शकलो ,स्वतःवर प्रेम करायला लागलो तेव्हा आपण इतरांना समजून  घेऊ शकतो, त्यांच्यावर प्रेम करू शकतो . काही वेळा जवळ मित्र नसतील तर मीच  माझा मित्र आहे असा विचार केला तर आपण स्वतःला कधीच एकटं  वाटणार नाही. नकारात्मक विचार मनात आले तरी त्यांना सकारात्मक विचारात नक्कीच परावर्तित करू शकू .

                   वेळ खूप अनमोल आहे आणि गेलेली  वेळ कितीही  ठरवलं  तरीही  परत मिळवता येत नाही. जन्माला आल्यापासून तर  मृत्यू  येईपर्यंत आयुष्याच्या विविध टप्प्यात वेळेचं महत्व हे वेगवेगळं असतं. जबाबदारी आल्यावर स्वतः साठी काहीतरी करायची वेळ खूप क्वचितच मिळते. कधी कधी आयुष्याच्या प्रवासात स्वतःसाठी जगणं  राहून जातं. ती सल मनात रहायला नको म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ देऊन बघा,  स्वतःचं  म्हणणं ऐकून बघा आणि कधी तरी काही क्षण का असो पण स्वतःसाठी जगून  बघा.........
                                                 म्हणूनच मी माझा .......... 


                                                                                सुनित कुलकर्णी 
                                                                              +91 9422292820
                                                                    sunitkulkarni@hotmail.com

  



 

टिप्पण्या

  1. खूप सुंदर. मनातले लिहिलेस. व्यक्त होणे तेही मोजक्याच, नेमक्या आणि चपखल शब्दात.खरंच अप्रतिम. असाच लिहित जा. शुभेच्छा सहित💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. खर आहे.स्वतः साठी वेळ असावा असे कधी लक्षात नाही येत.खुप सुंदर लिहिलंस, मनाला विचार करायला लावणारे लिखाण कायम लक्षात राहील खुप मनापासून शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............