तो............................


                         तॊ ............. जन्माला आल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात  मुलगा , भाऊ , मित्र , नवरा आणि बाबा ( वडील ) अशी विविध नाती तो सर्मथपणे  सांभाळत असतो.  विद्यार्थी दशेत चांगलं शिक्षण घेतलं तर तारुण्यात चांगली नोकरी/ व्यवसाय  करता येईल. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर  घरातले  खर्च , घरात राहणाऱ्या माणसांची आर्थिक आणि मानसिक आरोग्य ह्याची  जबाबदारी , त्यात कोणतीही परिस्थिती जर उद्भवलीच तर ते आर्थिक नियोजन करणं असतंच . लग्नासाठी  साथीदार म्हणून त्याची निवड ही  तो माणूस म्हणून कसा आहे ह्या पेक्षाही  त्याच्या आर्थिक निकषांवर , त्याच्या वार्षिक उत्पन्नावर salary package) , तो कोणत्या शहरात राहतोय ह्यावरून त्याची निवड केली जाते. त्याच्यासाठी लग्नानंतर नव्या नात्यांसोबत जुळवून घेत असतांनाच असेलेली (जुनी) नाती तितक्याच प्रेमाने जपायची असतात. वडील म्हणून जबाबदारी स्वीकारतांना पाल्याला  कोणत्याच गोष्टींची कमतरता पडू नये म्हणून तो त्याचं  सर्वस्व पणाला लावत असतो. आयुष्याच्या टप्प्यात ज्याप्रमाणे भूमिका बदलत जातात त्याच प्रमाणे जबाबदारीचं  स्वरूप बदलत जातं  किंबहुना ते वाढतंच  जातं  हे मात्र नक्की. हे सगळं तो सांभाळत असतांना  त्याची शारीरिक आणि मानसिक दमछाक होत असतेच. 

                         तो असा पटकन सहज व्यक्त होत नाही. त्या मागे सामाजिक, मानसिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत . सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं तर पुरुषांनी मजबूत असलं पाहिजे. पुरुष म्हणजे कुटुंबाचा आधार ज्यात जबाबदारी म्हणजे शांत राहणे म्हणजे परिपक्वता . भावना दाखवणं म्हणजे विशेषतः रडणं / भावनिक होणं हे काही प्रमाणात कमजोरी लक्षण आहे असे मानलं  जातं . मानसिक दृष्टिकोनातून बघितलं  Alexithymia म्हणजे स्वतःच्या भावना ओळखण्यात आणि व्यक्त करण्यात अडथळा, तो भावना व्यक्त करण्याऐवजी ते कृतीतून प्रतिक्रिया देतो . वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर पुरुषांमध्ये Testosterone चं प्रमाण जास्त असतं, जे स्पर्धात्मकता आणि नियंत्रणाशी संबंधित आहे, त्यामुळे त्याला व्यक्त होणं  सहज जमत नसेल . 

                         त्याने भविष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगात खंबीरपणे  उभं  रहावं  म्हणून लहानपणापासूनच सांगितलं जातं  की  तु  मुलगा आहे  तेव्हा  तुझं असं  रडत बसून राहणं योग्य नाही ( तु काय भित्री भागू बाई आहेस का असं  रडतोयस तर ). त्यामुळेच कळत - नकळत पणे लहानपणापासून त्याच्या मनावर हे बिंबवलं जातं की असलेल्या कोणत्याही परिस्थितीत कितीही  वाटलं  तरीही त्याने रडून चालणार नाही.

                         रडणं / डोळयांतून अश्रू येणं हे देखील व्यक्त होण्याचं एक माध्यम आहे. आपल्या शास्त्रांत ह्या संदर्भात उल्लेख आहे . जसं की वेदांत रडणे हे दुर्बलतेचे नव्हे, तर मनाच्या शुद्धीकरणाचे एक साधन मानले गेले आहे, रामायणात अश्रू हे प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचे प्रतीक आहेत. पतंजली योगसूत्र यांत रडणे हे कधी कधी भावनांचे शुद्धीकरण (Catharsis) मानले जाते , ज्यामुळे मन हलके होते. आयुर्वेदात चरक संहिता मध्ये दडपलेल्या भावनांमुळे मानसिक विकार निर्माण होतात असे सांगितले आहे. त्यामुळे योग्य वेळी रडणे हे मनासाठी हितकारक ठरते. समर्थ रामदास मनाला कठोर बनवतात, पण भक्तीतील अश्रूंना मान्यता देतात. संत ज्ञानेश्वर हृदयाला द्रवित होऊ देतात आणि अश्रूंना आध्यात्मिक सौंदर्य मानतात. थोडक्यात भारतीय धर्मग्रंथांमध्ये रडणे हे कमजोरीचे चिन्ह नाही तर ते मानवी संवेदनशीलतेचे प्रतीक आणि आत्मशुद्धीचे साधन आहे.   

                         आधुनिक विज्ञान आणि मानसशास्त्र रडणे ही नैसर्गिक, आरोग्यदायी आणि आवश्यक प्रक्रिया आहे.  ते शरीर आणि मन यांच्यातील संतुलन राखण्यास मदत करते, भावना व्यक्त करणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी कोणी जर रडत असेल / डोळयांतून अश्रू येत असतील  तर त्या व्यक्तीला ( तो / ती नाही ) कमजोर , कमकुवत म्हणणं  किंवा त्याबद्दल तसं काहीसं  मत व्यक्त खूप चुकीचं आहे.

                         त्याला लहानपणापासून काही गोष्टींची सवय लावली जात नाही किंबहुना त्याला ती करू दिली जात नाहीत. जसं  की घरातली छोटी आणि सहज शक्य अशी कामं जसं  की कोणी मागितलं  तर त्याला पाणी देणं,वस्तू जागच्या जागी ठेवणं , घरात साफ-सफाई करतांना जी शक्य आहे ती मदत त्याला करू दिलं जात नाही.  सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने ती करावी असा त्याला आग्रह सुद्धा केला जात नाही.  इतरांचं सोडा स्वतःला लागणारं पाणी  उठून घेऊन परत ते भांडं  घेतलेल्या जागेवर त्याने ठेवावं इतपत सुद्धा अपेक्षा त्याच्याकडून केली जात नाही. ह्या मागे नक्की ते पालकांचं विशेषतः आईचं  प्रेम असतं  की आणखी काही हे मला सांगणं कठीण जातंय. 

                         त्याला लहानपणापासूनच हे  जितकं आवर्जून सांगितलं जातं की  खूप मोठा हो , चांगलं शिक्षण घे , चांगली नोकरी कर / व्यवसाय कर (स्वतःच्या पायावर उभा राहा ) , घराची / घरातल्यांची आर्थिंक आणि मानसिक काळजी घेता येईल इतका सक्षम हो ,चांगला माणूस हो, सगळ्यांचा आदर ठेव ह्या सोबतच काही गोष्टींची सवय लावली जसे की घरातलं/ स्वतःचं  कोणतंही काम करणं  हे कमीपणाचं नाहीये ह्याची जाणीव करून दिली तर त्यात काहीच गैर नाहीये. लग्न होण्यापूर्वी तो घरात आईला - बहिणीला मदत करू शकेल आणि लग्नानंतर बायकोला .उलट ह्या गोष्टीचा  त्याला आणि सोबत राहणाऱ्या लोकांनाच फायदा होणार आहे. तो आत्मनिर्भर होईल .  

                         तो भावना व्यक्त करत नाहीत म्हणजे ते भावनाहीन नाही.  तो अनेकदा जबाबदारी, समाजमान्यता आणि संस्कारांच्या चौकटीत अडकलेला असतो . तो अनेकदा “शांतपणे सहन” करतो . पण आजच्या काळात भावनिक अभिव्यक्ती ही कमजोरी नसून परिपक्वतेचे लक्षण मानली जाते. असं ही होतं की जीवनातील ताणतणाव, अपयश, चिंता, एकटेपणा किंवा नैराश्य हे त्याला असहनीय होतं आणि त्यातून  तात्पुरता दिलासा मिळवण्यासाठी तो नकळत व्यसनांच्या आधीन होतो. सगळेच व्यसनांच्या आहारी जातात असं  नाही . मी जीवनातील ताणतणाव, अपयश, चिंता, एकटेपणा किंवा नैराश्य असतांना  व्यसनांच्या आहारी जाण्याचं समर्थन करत नाही आणि कधी करणारंही  नाही. अश्या परिस्थितीत त्याने आई ,बहीण, मैत्रीण ,बायको यापैकी ती कोणीही असू शकते तिच्या सोबत मनमोकळं करावं,व्यक्त व्हावं. तो व्यक्त होत असतांना त्याला पूर्ण समजून घेणं ही मात्र तिची जबाबदारी.

                         खरं तो आणि ती असं तुलना करणं योग्य नाही . नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत  म्हणून त्या नाण्याला किंमत आहे.  त्याच प्रमाणे  तो आणि ती च अस्तित्व आहे . दोघं एकत्र असतील तर ते आयुष्य परिपूर्ण आहे.  मला इतकंच  म्हणायचं आहे  की  तिचं मन राखतो , तिचा आदर ठेवतो  आणि तीला जसं  समजून घेतो. तसंच त्याचंही मन राखा, त्याचा आदर करा आणि त्याला समजून घ्या......

                                                                                                                                                                                  सुनित कुलकर्णी 



टिप्पण्या

  1. सुंदर. तो अगदी चपखलपणे टिपला आहे. तो तुमच्या आमच्यात ,परिवारात,समाजात नक्कीच आहे. तसाच अव्यक्त, मूक आणि कर्तव्य साधनेत आयुष्य जगणारा आहे. क्वचितच तो एखाद्याकडे व्यक्त होतो तेही सूचकपणे.
    खूप छान. असाच लिहित जा. शुभेच्छासह
    शशिकांत कुलकर्णी, नाशिक

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............