गुरु.........
जेव्हा एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व घडतं तेव्हा शिक्षणासोबत आजूबाजूला असणारं वातावरण, माणसं ह्यांचा खुप प्रभाव असतॊ . ह्या सगळ्यांत माणूस वावरतो आणि त्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. माणूस हा जन्माला आल्यापासून तर मरे पर्यंत नेहमीच काही ना काही तरी शिकतच असतॊ. ज्यावेळी तॊ शिकतो असं आपण म्हणतो त्यावेळी ते शिक्षण हे फक्त शाळा, कॉलेज आणि परीक्षेपुरतंच मर्यादित नसतं. सगळ्याच गॊष्टींचे ज्ञान हे पुस्तकांतून मिळेलच आणि पुस्तकांतूनच मिळतं असं नाही. काही गॊष्टींचे ज्ञान हे त्याला इतरांच्या विचारातून, अनुभवातून येतं तर काही गॊष्टी ह्या ताओ स्वतःच्याच अनुभवातून शिकत असतो. ह्याचं एकअगदी साधं उदाहरण द्यायचे झालंच तर रस्त्यावर चालतांना जर आपलं लक्ष नीट रस्त्याकडे नसेल तर ठेच लागुन पायाला दुखापत होते. हा कोणाचा अनुभव आपण ऐकलेला असतॊ , कदाचित आपण स्वतःही अनुभवलेला असतो . आयुष्यात अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण स्वतः कधी अनुभवलेल्या नसतात पण तरीही आपण त्या प्रमाणे वागत असतॊ.
सगळ्या जगाची माहिती पुस्तकांत सामावलेली आहे, महापुरुष ह्यांचे चरित्र, वीर योद्धयांच्या शौर्यगाथा, लॊकांचे अनुभव , विचार , व इतर बरंच काही जरी पुस्तकात नमूद केलेलं असलं तरीही काही गोष्टी ह्या स्वतः अनुभवल्या शिवाय कळत नाही. काही गोष्टींचं कितीही स्पष्टीकरण दिलेलं असलं तरीही काही गोष्टींचे अर्थ हे आपल्याच आपले समजतात आणि ते प्रत्येक वेळी नमूद केल्या प्रमाणेच असतीलच असं नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, Read between the lines अगदी तसंच .
ज्याप्रमाणे माती पासून एक चांगली कलाकृती निर्माण होते , त्याच प्रमाणे आपणही तसंच घडत असतॊ. निसर्गात असलेल्या विखुरलेली माती ज्या प्रमाणे मूर्तिकार गोळा करतो , तिला चाळतो , स्वच्छ करतॊ आणि मग त्याला आकार द्यायला सुरुवात करतो. एकदम पहिल्याच प्रयत्नात त्या कलाकृतीला आकार दिला आणि ती पूर्ण होते असं नाही. खूप प्रयत्नांनंतर हळू हळू ती कलाकृती आकार घ्यायला सुरुवात होते आणि तिला एक आकार मिळतो , तो आकार मिळाल्यावर ,थोडे फार असलेले बदल करून , तिला किमान आयुष्य मिळावं म्हणून त्यावर काही प्रकिया करून उदा. भाजणं ही प्रकिया करून शेवटी तिला यॊग्य ती सजावट केल्यावर , त्याची ती कलाकृती पूर्णत्वास येते. किंबहुना आपल्या बाबतीतही असंच काहीसं घडत असतं . ९ महिने टप्प्या टप्प्याने आईच्या गर्भात आपली वाढ होत असते. आपणही असंच विखरलेलो असतो , एकरूप होतो आणि ह्या सुष्टीत प्रवेश करतो. आपले पालक आपल्याला आकार देण्याचा प्रयत्न करत असतात ह्या सगळ्यांत आपले शिक्षक हे देखील त्यांना यात महत्वाची भूमिका पार पडतात. ज्या प्रमाणे मूर्तिकार काही विशिष्ट साहित्य वापरतो त्याच प्रमाणे शब्द, पुस्तके हे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या ह्या घडण्यात पुरक ठरतात आणि आपण घडत असतॊ. जसा वेळ जात राहतो आपल्या ह्या घडण्यात आपल्या आजूबाजूला असणारी माणसं , आपले मित्र किंबहुना ह्या सृष्टीत असणाऱ्या सगळ्यांचा सजीव गोष्टींचा सहभाग असतो. मला मूर्तिकाराच्या त्या कलाकृतीत आणि आपल्यात एकच फरक वाटतो. तॊ म्हणजे मूर्तिकाराच्या त्या कलाकृतीने एक विशिष्ट स्वरूप घेतल्यावर त्या कलाकृतीला घडवण्याची प्रकिया थांबते . पण तेच आपल्या बाबतीत होत नाही , आपली ही घडण्याची प्रकिया फक्त आपल्या आकार पुरतीच मर्यादित नसते तर अनुभव, विचार , ह्या माध्यमांतून ती जॊवर आपण जिवंत असतो तॊ पर्यंतअशीच निरंतर सुरूच राहते.
आपण जन्माला आल्यापासून तर हे जगाचा निरोप घेतो त्या क्षणापर्यंत पर्यंत काही तरी शिकत असतो. आपण कोणाकडून शिकतॊय ह्या पेक्षा आपण त्याच्या कडून काय शिकतोय आणि जे शिकलो त्यातून आपण आपल्या किंवा इतरांच्या आयुष्यात कॊणता चांगला बदल , विचार घडवू शकतो हे खूप महत्वाचं असतं . एक साधं आणि सर्वांना माहित असलेलं उदाहरण देतो. आपण सहज बाहेर खिडकीत बघितलं तर चिमणी तिचं घरटं बनवते . त्यासाठी कुठून कुठून ती काड्या गोळा करून आणते आणि तिचं घरटं बनवते. एक दिवस खूप जोऱ्यात वारा येतो आणि ते घरटं तुटतं , विखुरतं . चिमणी येते आणि बघते घरटं नाही राहिलं , तेव्हा ती परत त्याच जोमाने सगळं करून पुन्हा प्रयत्न करून विखुरलेलं तिचं घरटं ती बनवत राहते. ह्या गोष्टीचा बॊध सर्वांना माहित आहे. वास्तवात ती चिमणी कुठे शिकलेली नसते , तिचा अनुभव आणि तिचे प्रयत्न हेच तिचे शिक्षक असतात.
गुरु म्हणजे प्रत्येक वेळी गुरु हे कोणी साधु किंवा ऋषीमूनी, तपस्वीच असतील असे नाही. आपल्या आयुष्यात आपले आई-वडील , बहीण -भाऊ, आप्तेष्ट , शाळा- महाविद्यालयातले शिक्षक ,मित्र ,आपले सहकारी हितचिंतक, आपले शत्रू ,समाज, हा निसर्ग आणि ह्या सृष्टीतले हे सगळेच आपले गुरु आहेत. ज्यांच्या कडून आपण नेहमीच काहीतरी शिकत असतो. ह्या सोबतच आपला स्वतःचा अनुभव हा सुद्धा आपला गुरूच आहे. त्यामुळेच ह्या सगळ्यांना आपण नेहमीच वंदन आणि आदर केलाच पाहिजे आणि आयुष्यात कितीही मोठं झालं तरी नेहमीच आपली काहीतरी शिकण्याची इच्छा हवीच . .......
गुरु ब्रह्मा गुरु विष्णुः
गुरु देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
सुनित कुलकर्णी

Very nice!
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवावाह वाह छान, मस्त आहे..... गुरू
हटवाखूप छान. 👌👌👍👍
उत्तर द्याहटवा