मित्र........


                     खरं  तर परमेश्वराने आपण कधी जन्म घ्यायच्या, आपले आई वडील कोण , कोणत्या देशात, कोणत्या कुटूंबात जन्म घेणार हे निवडीचं  स्वातंत्र्य कोणालाच दिलं नाहीये  . ज्या कुटुंबात जन्माला येतो  बहीण भाऊ, आजी आजोबा आणि असंख्य असे नातेवाईक  ज्यांना आपण रक्ताची नाती म्हणतो ती आपोआपच मिळतात. पण  परमेश्वराने ' मित्र ' निवडीचं  पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलंय . आपण कोणाला मित्र म्हणायचं , कोणासोबत मैत्री करायची ह्या साठी आपल्याला कोणीही कोणतंच  बंधन असु  शकत नाही .

                    माझ्या मते  ' मित्र ' ह्याला कोणत्याही  कक्षेत त्याचं  असं  वर्गीकरण करूच शकत नाही . ' मित्र ' म्हटल्यावर त्याला चांगला मित्र आणि वाईट मित्र,  वयाचं , शिक्षणाचं , जातिचं , धर्माचं ,लिंगाचं  असं  कोणतंही बंधन आणि भेद करता येत नाही.  माणसाप्रमाणे इतर प्राणी  सुद्धा आपले  चांगले  मित्र असू शकतात .निसर्ग हा सुद्धा आपला मित्र असू शकतो संत तुकाराम महाराज म्हणतात " वृक्षवल्ली आम्हा सॊयरी  वनचरे  ".  समस्त प्राण्यांमध्ये  कुत्रा हा खूप पूर्वीपासून माणसाचा चांगला मित्र आहे. मित्र म्हणून जर कोणी हा भेद करत असेल तर त्याला मित्र म्हणताच येणार नाही.  मित्रांत असलेली मैत्री आणि ही  मैत्री म्हणजे नक्की काय हे शब्दांत  मांडणं अशक्यंच  आहे . मित्र हा कधीही तो आपल्यापेक्षा लहान आहे की  मोठा आहे, काळा आहे की गोरा आहे, श्रीमंत आहे की  गरीब , तो कॊणत्या धर्माचा - जातीचा आहे , त्याचे शिक्षण काय  व इतर असे कोणतेच भेद हे मित्र म्हणून करता येत नाही . 

                    प्रत्येकासाठी  त्यांचा असलेला मित्र हा Special  असतोच. मुलगा आणि मुलगी तसेंच  माणूस आणि स्त्री हे सुद्धा चांगले मित्र असू शकतात rather  असतात सुद्धा. आपल्या इतिहासात मैत्रीची अशी बरीच उदाहरणे आहेत , ज्या मैत्रीबद्दल  आजही  बोललं जातं  त्यातलीच काही जसे की  कृष्ण - सुदामा , राम - सुग्रीव, कृष्ण - द्रौपदी , कृष्ण - अर्जुन , कर्ण - दुर्योधन , लोकमान्य टिळक - मो. जिन्ना या बरोबरच आपल्या चित्रपटांतील  काही अजरामर पात्रं  शोले चित्रपटातील  तील  जय - वीरू , आनंद चित्रपटातील  डॉ. भास्कर बॅनर्जी - आनंद सैगल, मुन्नाभाई MBBS  चित्रपटातील  मुन्ना भाई - सर्किट. इतिहासात आणि चित्रपटांत  अशी बरीच उदाहरणे आहेत त्यातली काहीच मी इथे नमूद केलेली आहेत . मैत्रीवर आधारित काही गाणी जी अजरामर आहेत जसे की  शोले चित्रपटातलं  ये दोस्ती हम  नही  छोडेंगे ......... , के  के ने गायलेलं यारो  दोस्ती बडी ही  हसीन है......... , शौर्य चित्रपटातलं दोस्ती क्या है......... ही  काही गाणी जी मैत्री बद्दल खुप काही सांगतात . 

                    मैत्री हा एक अनुभव आहे जो प्रत्येक जण अनुभवत असतोआणि मित्रांबद्दलच्या सगळ्यांच्याच काही तरी  आठवणी असतात  . आजच्या ह्या तांत्रिक युगात  जगात असे खूप कमी जण असू शकतील की  ज्यांना कोणी मित्र नाही.  नक्की मित्र कोणाला म्हणावं , नक्की मित्र म्हणजे कोण ह्यावर प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतंच. बऱ्याच वेळा जो आपली नेहमी मदत करतो , जो नेहमी आपल्या सोबत असतो त्यालाच आपण मित्र मानणं हे मला कुठे तरी चुकीचं वाटतं . मित्र सोबत असतो, आणि तो आपल्याला मदतंही  करतो पण प्रत्येक वेळी आपल्या सोबत असणाऱ्या आणि आपल्याला मदत करणाऱ्यांना  आपण आपले मित्र मानतो ??? मैत्री ही  फक्त एखाद्या कामापूरती  मर्यादित असायला नको तर कामाशिवाय सुद्धा मैत्री असायला हवी. मैत्री ही कधीही निरपेक्ष हवी.  मैत्री कोणत्या वयात , कोणासोबत होईल हे कोणालाच सांगता येत नाही. कधी कधी काही लोकांसोबत आपण वर्षोनुवर्षे  असतो पण त्यांच्या सोबत आपली मैत्री होत नाही आणि तेच काही लोक असे असतात की  खूप कमी कालावधीत नकळतच ते आपले खूप चांगले मित्र होतात. 

                    नातं , प्रेम आणि मैत्री ह्याबद्दल जर थोडा विचार केला तर मैत्रीला नेहमी मैत्रीच  राहू द्यावं , त्यात प्रेम आणि नातं कधीही शोधायचं  नसतं . बऱ्याच वेळा निखळ मैत्रीत प्रेम शोधलं  जातं किंवा त्या निखळ मैत्रीलाच प्रेम समजलं  जातं.नात्यात जर प्रेम आणि मैत्री असेल तर ते नातं आणखी दृढ होतं  आणि प्रेमात जर मैत्री असेल तर  ते प्रेम आणखी फुलवता येतं , त्याला नात्याचं नाव देता येतं  पण तेच मैत्रीच्या बाबतीत त्यात नातं  आणि प्रेम  न आणता मैत्रीला मैत्रीचं  राहू द्यावं  कारण  मैत्री ही  नातं आणि प्रेमाच्या  चौकटीत असूच शकत नाही.

                    खरा मित्र कॊण ह्यावर इंग्रजीत असलेली सर्वज्ञात  म्हण  आहे A friend in need is a friend indeed" . मित्र हा नेहमी आपल्या दुःखात, अडचणीत, अपयशात  आपल्या सोबत असतोच या बरोबरच तो आपल्या आनंदात, यशात सुद्धा तितकाच सहभागी असतो . जो आपल्याला चांगल्या कामात सॊबत करेल पण तेच जर आपण काही चुकीचं काम करत असू, आपला रस्ता भरकटला असेल तर तो हक्काने कान  पिळून आपल्याला यॊग्य  मार्गावर आणतो ,आपल्याला रस्ता दाखवतो . मुळात मैत्रीत व्यवहार नकोच आणि जर असेल तर तिथे व्यवहाराने वागणंच  गरजेचं  असतं . मित्रांमध्ये सुद्धा मतभेद होतात, भांडणं  होतात पण काही ठराविक कालावधी नंतर सगळं  विसरून ते एकत्र येतातच . भलेही  मित्राची रोज भेट होत नसेल, बऱ्याच दिवसांत , वर्षात भेट होत नसेल  पण तरीही न  बोलता ज्याला आपल्या मनातलं  कळतं  तोच  खरा मित्र .....

                    आज २२ व्या शतकात सगळं Digital  युग आहे, त्यात आपले मित्र सुद्धा digital  झालेत . काहींना तर  माणूस म्हणून मित्र नकोत  त्यांच्यासाठी Mobile , Laptop  व  इतर gadgets  हेच त्यांचे  मित्र वाटतात. Mobile  तर हा सगळ्यांचाच मित्र आहे असं  म्हंटलं  तर फारसं  चुकीचं  ठरणार नाही 😉. आपण रोज  वापरत असलेली उपकरणे, साधने ह्यांना सुद्धा आपण मित्र म्हणू शकतो . एक  गमतीचा भाग म्हंटलं तर  Google  ची  Google  Assistant , Amazon  ची  Alexa  आणि Apple  ची  Siri  ह्यांना आपल्याला चांगल्या मैत्रिणी म्हणू शकतो  , आपण बोललं  त्या सगळं ऐकतात  आणि आपल्या कामात नक्कीच मदत करतात 😀😀हा खरं  तर एक चर्चेचा विषय होईल आणि अगर  बात  निकालेगी  तो  बहुत दूर तक  जायेगी  !!!!! असो  विषयांतर नको.

                   आज अशी बरीच माध्यमं  आहेत ज्याच्या मार्फत आपण आपल्या मित्रांना  ते जगात कुठेही असो त्यांना  शोधता येतं , त्यांच्यासोबत संपर्क साधता येतो. एखाद्या सोबत आपली  ओळख आहे , त्याच्याबाबदल थोडीफार  माहिती आहे   म्हणून त्याला मित्र म्हणता येत नाही .  मैत्री ही  कधीही ठरवून , प्रयत्न करून, जबरदस्ती करून , लादून  होत नसते , ती कधी आपॊआप होते हे आपल्यालाही कळतं नाही .  आज  कोणालाही  संपर्क  करणं, तो साधणं  खूप सोपं   आहे  पण त्यानंतर संपर्कात राहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं .मराठीत सांगायचं  झालं  तर 😀😀 Connect  होणं  खूप सोपं  आहे  पण तेच Connected राहणं  तितकंच  महत्वाचं  आहे ....... ह्या विषयावर मी सविस्तर वेगळा लेख नक्की लिहणार आहे.  

                    दर वेळी मैत्री म्हणजे मज्जा, धम्मालच  करायची असते असं नाही. मित्र आणि त्यांच्या संकल्पनेतून काही चांगल्या गोष्टीची सुरुवात, समाजोपयोगी उपक्रम सुद्धा साध्य केला जाऊ शकतो  rather अशी  बरीच उदाहरणे आपल्याला सभोवताली आहेत. 

                    आपल्या Contact  list  मध्ये शेकडो मित्रांचे Phone  Number  Save  केलेले आहेत , WhatsApp  वर मित्रांच्या बऱ्याच  Group  मध्ये  आपण आहोत , Facebook  व  इतर Sites  वर आपल्या Friends  List  मध्ये खूप मित्र आहेत. पण कधीही आपल्याला अडचणीत  असो वा  आपल्या एकटेपणात आपल्याला जेव्हा कोणाशी बोलावंसं  वाटलं , मन मोकळं  करावंसं वाटलं  तेव्हा ज्या मित्राला आपल्याला Phone  करावासा  वाटेल , त्याला भेटावंसं  वाटेल , ज्याच्या सोबत मनमोकळे पणाने  बोलता येईल  असे किती मित्र आपल्याला आहेत हा एकदा विचार नक्कीच केला पाहिजे . काहीवेळा  खूप मित्रांच्या गर्दीत राहून हरवण्यापेक्षा कमी पण आपल्या हक्काची बॊटावर  मोजण्याइतके  तरी मित्र आपल्या आयुष्यात नक्कीच असावे ............... 

                                                                                                                   सुनित कुलकर्णी  

                    



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............